कोल्हापूर- पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगला राजकीय वळण मिळाले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांच्याकडून मला विचारणा झाली होती. मात्र जनतेला विचारात घेऊन महाविकास आघाडी सरकार सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शिरोळमध्ये निवडून आलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भाजपमध्ये येण्यासाठी संपर्क केला होता. असा दावा राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केला होता. या दाव्यात तथ्य असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शुक्ला यांनी आपल्याशी संपर्क केला होता. भाजपमध्ये येण्याबाबत विचारणा केली होती. मात्र आपण कार्यकर्ते आणि मतदार संघातील लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असा निरोप शुक्ला यांना दिला होता. जनतेशी केलेल्या चर्चेनंतर मी महाविकास आघाडी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याची कल्पना आपण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील दिली होती, असेदेखील यड्रावकर यांनी म्हटले आहे. यड्रावकर यांच्या स्पष्टीकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेला दाव्यात पुष्टी मिळाली आहे.
हेही वाचा-रश्मी शुक्ला भाजपच्या 'एजंट', नवाब मलिक यांचा घणाघात
रश्मी शुक्ला यांच्यावर होणार आहे कारवाई-
रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राज्य सरकार कायदेशीर कारवाई करणार आहे. फोन टॅपिंग प्रकरणात ही कारवाई केली जाणार आहे. तर परमबीर सिंग यांच्या विरोधातही शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. याच दरम्यान, कमिशनर ऑफ इंटेलिजन्स असताना रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा मांडलेला मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी काही लोकांचे फोन टॅपिंग करून भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.