कोल्हापूर- राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेला लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण शंभर टक्के भरले आहे. धरण शंभर टक्के भरल्यामुळे एकूण सात दरवाजांपैकी तीन आणि सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
राधानगरी धरण 'ओव्हरफ्लो'; दोन स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू
कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. पंचगंगा नदीनेही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी उघडण्यात आले. हे दरवाजे स्वयंचलित असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होणार आहे. सलग पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत होती. मंगळवारी रात्री राधानगरी धरण 99 टक्के भरले होते. त्यामुळे मंगळवारी रात्रीच प्रशासनाकडून धरण क्षेत्रात तसेच नदी शेजारी वसलेल्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी पंचगंगा नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे आता धोक्याच्या पातळीकडे या नदीने वाटचाल सुरू आहे. इशारा पातळी 39 फूट असून सध्याची पाणीपातळी 39 फूट 6 इंच एवढी झाली आहे. राधानगरी धरण सुद्धा आता 100 टक्के भरले आहे.