कोल्हापूर -अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या स्वच्छतेपासून देवीच्या सर्व सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करून त्याला झळाळी देण्यात आली आहे. देवीच्या दागिन्यांच्या या मौल्यवान खजिन्यात रत्नजडित किरीट, हिऱ्याची नथ, मोत्याची माळ, कवड्यांची माळ, श्रीयंत्र हार, जडावाचे मयूर कुंडले, सोन्याचा किरीट, सोळा पदरी चंद्रहार, 84 मण्यांचा लफ्फा, मोर पक्षी, अशा अनेक दुर्मिळ अलंकारांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांची आज स्वच्छता करण्यात आली. नवरात्रोत्सवातील प्रत्येक दिवशी यातले रत्नजडित दागिने देवीला परिधान केले जातात.
हे ही वाचा -Navratrotsav 2021: पारंपरिक येरले पद्धतीने मूर्ती झाकून अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता
यंदा नवरात्रोत्सवात भक्तांसाठी मंदिरे उघडल्याने उत्साहाचे वातावरण -
दरवर्षी कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव पार पडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी भक्तांविना नवरात्रोत्सव पार पडला. मात्र यावर्षी नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच राज्यभरातील सर्व मंदिरे उघडली जाणार आहेत. त्यामुळे भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. रविवारी चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली तर आज अंबाबाईच्या सर्वच सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली.