कोल्हापूर -प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण सोहळा वाद चिघळला आहे. पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती पुढे आली आहे. आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावर हा वाद झाल्याची माहिती आहे. भारत बटालियनच्या आरक्षित जागेत रिंगण सोहळा करण्याचा वारकऱ्यांचा आग्रह होता. मात्र रिंगण सोहळ्याला भारत बटालियनने विरोध केला. हरिनाम सप्ताह निमित्त रिंगण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. पोलिसांच्या मध्यस्तीमुळे वाद निवळला असला तरी तणाव मात्र कायम आहे.
'त्या' आरक्षित जागेवर रिंगण सोहळा घेण्यासाठी वारकरी ठाम : दरम्यान, भारत बटालियनच्या आरक्षित जागेवर गेल्या काही वर्षांपासून रिंगण सोहळा होत आहे. आज सुद्धा हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रिंगण सोहळ्याचे नियोजन गावकऱ्यांनी केले होते. या बटालियनच्या आरक्षित असलेल्या जागेवरच रिंगण करण्यावर वारकरी आणि ग्रामस्थ ठाम होते. मात्र या रिंगण सोहळ्याला भारत बटालियनच्या पोलिसांनी विरोध केल्याने हा वाद आणखी चिघळला आणि प्रचंड धक्काबुक्की झाली.