कोल्हापूर- कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनेक उदाहरणे आहेत. रोज एक नवीन उपक्रम सुरू करून कोल्हापूरकरांनी नेहमीच राज्यात व देशात आदर्श घालून दिला आहे. असाच एक उपक्रम म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने होणारे मोफत अंत्यसंस्कार. या अंत्यसंस्काराला दान म्हणून रक्कम स्वीकारली जाते. तेही नातेवाईकांच्या इच्छेनुसार. यावर्षी तब्बल महापालिकेच्या तिजोरीत साडेदहा लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या दातृत्वात काहीच कमी नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
'जगभर फिरावे पण कोल्हापुरात मरावे' असे प्रत्येक कोल्हापूरवासियांचे मत आहे. कारण रीतीरिवाजाप्रमाणे कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात, तेही मोफत. केवळ नातेवाईकांच्या इच्छेनुसारच दानपेटीत रक्कम टाकली जाते. एक मृतदेह जाळण्यासाठी जवळपास तीन हजार खर्च येतो. तीनशे किलो लाकूड, दोनशे शेणी असे साहित्य लागते. खर्च कोल्हापूर महानगरपालिका मोफत करते. नातेवाईकांनी इच्छेनुसार दान करण्यासाठी या स्मशानभूमीत 3 दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या दान पेटीत यंदा तब्बल नऊ लाख रुपये इतकी रक्कम कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीला मिळाली आहे.