कोल्हापूर- वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव! नवरात्रोत्सवात संपूर्ण देशभरातील नागरिक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही मंदिर दर्शनासाठी खुली करण्यात आली नाहीयेत. मात्र यावर्षी सुद्धा जास्तीत जास्त भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता यावे यासाठी सोशल मीडियावरून दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य राजेंद्र जाधव यांनी याबाबत माहिती दिली असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ईटीव्ही भारत विशेष : आता अंबाबाईचे दर्शन युट्यूब आणि फेसबुकवरून सुद्धा - Ambabai Navratri festival
कोरोनामुळे अद्यापही मंदिरे बंद आहेत. परंतु नवरात्र उत्सवात देवीचे दर्शन भाविकांना घडावे यासाठी शहरात स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच फेसबुकवरुन लाईव्ह दर्शनाचा लाभही भक्तांना घेता येणार आहे.
दरवर्षी प्रत्येकजण ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पहात असतात त्याच शारदीय नवरात्रोत्सवावेळी यंदा अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश नाहीये. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र ज्या उत्साहात नवरात्रोत्सव पार पाडतो त्याच उत्साहात यावर्षी सुद्धा नवरात्रोत्सव पार पडणार आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पडणार आहेत. शिवाय ज्या पद्धतीने देवीची विविध रुपात पूजा बांधण्यात येते ती सुद्धा दररोज बांधण्यात येणार आहे. मात्र याचे प्रत्यक्षात मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नसले तरी देवस्थान समितीने भक्तांना दर्शनासाठी सोय केली आहे.
शहरातील विविध १० ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. याद्वारे कोल्हापूरातील भक्त देवीचे दर्शन घेऊ शकणार आहेत. तर संपूर्ण देशभरातील नागरिकांना सुद्धा देवीचे दर्शन घेता यावे यासाठी आता लाईव्ह दर्शनाबरोबरच सोशल मीडियावरून सुद्धा लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. अंबाबाईचे देशभरात लाखोंच्या संख्येने भक्त आहेत. त्यांना सुद्धा यंदा कोल्हापूरात येता येणार नाहीये त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.