कोल्हापूर -राजस्थानमधील जेलमधून पळून गेलेला आणि गेले काही वर्षे फरार झालेला कुख्यात गुंड पप्पू गुर्जर याला कोल्हापुरात अटक करण्यात आली. राजस्थान पोलीसांनी कोल्हापुरातील सरनोबतवाडी नजीकच्या उजळाईवाडी कॉलनीत मोठ्या शिताफीने अटकेची कारवाई केली. संबंधित गुंड कोल्हापुरात दोन वर्षे वास्तव्यास होता अशी माहिती समोर आली असून राजस्थान पोलिसांनी त्याला रात्री अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार -
राजस्थानमधील कख्यात गुंड पप्पू गुर्जर याला 6 सप्टेंबर 2019 ला त्यांच्या साथीदारांनी ए-के 47 फायरिंग करून पळवून नेले होते. तेंव्हापासून तो फरार होता. त्याच्यावर राजस्थानमधील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यात त्याला न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. शिक्षा भोगत असतानाच तो अल्वर राजस्थान येथील जेलची सुरक्षा भेदून पळाला होता. संबंधित कुख्यात गुंडाने कोल्हापूरात आश्रय घेतल्याची माहिती राजस्थान पोलीसांना मिळाली. तो गुंड कोल्हापूरात उजळाईवाडी कॉलनीत रहात होता अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार राजस्थानमधील पोलीसांचे एक पथक कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापूर पोलीसांच्या समवेत राजस्थान पोलीसांनी मध्यरात्री पोलिस फौजफाटा तैनात करुन त्या गुंडाला ताब्यात घेतले. त्याला काल रात्रीच त्याला राजस्थानला नेण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती.
गुर्जर कोल्हापूरातील प्रियसीकडे राहत होता अशी प्राथमिक माहिती -
गेल्या दोन वर्षांपासून गुर्जर येथील प्रियसीकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिया नामक त्याची प्रियसी कोल्हापुरात होती. तिच्याजवळच पप्पू गुर्जर याने आश्रय घेतला होता अशी माहिती मिळाली असून अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आहे.