कोल्हापूर : अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत केवळ मनमानी कारभार करत आले, असा ठपका ठेवत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यांच्याजागी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनाच प्रभारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, हे सर्व अनधिकृत आहे. मी कोणालाही सोडणार नाही. यांच्याविरोधात न्यायालयात जाऊन मी पुन्हा पदावर बसेन. सुशांत शेलार यांनाच अध्यक्ष व्हायचं होतं म्हणून त्यांनी हे सगळं केलं, असा आरोप मेघराज राजेभोसले यांनी केला.
चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मेघराज राजेभोसले यांची हकालपट्टी; अविश्वास ठराव मंजूर - मेघराज राजे भोसले यांची हकालपट्टी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मनमानी कारभार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. धनाजी यमकर हे प्रभारी अध्यक्ष म्हणून चित्रपट महामंडळाचे काम पाहतील.
मेघराज राजे भोसले
अखिल भारतीय चित्रपट महामंडळातील वाद काही केल्या संपत नव्हते. अनेक विषयांबाबत कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. मात्र, यामध्ये अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा संचालकांनी राजीनामा मागितला. त्यानंतर 'मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. मुळात हा विषय विषयपत्रिकेवर आलेला नसल्याने सर्व बेकायदेशीर आहे.' असे म्हणत राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर मेघराज राजेभोसले ठाम राहिले. याच मुद्द्यावरून बैठकीत बराचवेळ गोंधळ पाहायला मिळाला.
8 विरुद्ध 4 मतांनी कार्यकारिणीमध्ये अविश्वास ठराव मंजूर -
अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी मनमानी कारभार आणि गैरकृत्य केले असल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 8 विरुद्ध 4 मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर धनाजी यमकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले.
सुशांत शेलार यांच्यावर मेघराज राजेभोसलेंचा आरोप -
झालेला सर्व प्रकार हा बेकायदेशीर आहे. शिवाय या सर्व गोष्टींमागे केवळ सुशांत शेलार यांचा हात आहे. सद्या प्रभारी अध्यक्ष म्हणून यांनी धनाजी यमकर यांची निवड केली आहे. मात्र, पुढच्या 8 दिवसात सुशांत शेलार यांना अध्यक्ष करतील, असेही मेघराज राजेभोसले यांनी म्हटले. दरम्यान, या बेकायदेशीर बैठकीबाबत मी न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
भोसले यांनी विश्वास तोडला - सुशांत शेलार
भोसले यांच्यावर विश्वास होता. मात्र गेल्या काही वर्षात अध्यक्ष राजेभोसले यांनी आमचा विश्वास तोडला. अशा काही गोष्टी घडल्या आहेत, ज्या व्हायला नको होत्या. त्यामुळेच त्यांच्याविरोधात अविश्वास ठरावमंजूर करण्यात आला असल्याचे सुशांत शेलार यांनी म्हटले.