कोल्हापूर -गॅस दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी रस्त्यावर चूल मांडत त्यावर भाकरी थापत मोदी सरकारचा निषेध केला. घरगुती गॅसचे दर ८३८ रुपयांपर्यंत, तर पेट्रोलचे दर १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कोरोनाच्या संकटात महागाई वाढवून केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. गॅसचे दर वाढल्याने गॅस घेणे परवडत नाही. त्यामुळे विज्ञानाच्या गप्पा मारणाऱ्या मोदी सरकारने पुन्हा एकदा चुलीवर जेवण करण्यास भाग पाडले, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
'गांधी लढे थे गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे'
केंद्र सरकारने गॅसचे दर पुन्हा एकदा वाढवल्याने सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणी यांच्यामध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. कोरोनाकाळात महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा काळात केंद्र सरकारने महागाई कमी करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ केल्याने, सध्या घरगुती गॅस 838 रुपये इतका झाला आहे. याविरोधात आज राज्यभरात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले आहे. कोल्हापुरात देखील अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी रस्त्यावरच चूल मांडत त्यावर भाकरी थापत केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाई कमी करण्याची मागणी केली. गांधी लढे थे गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
'गोपीचंद पडळकरांना कोल्हापुरात फिरू देणार नाही'
गेल्या अनेक दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकर हे अनेक मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. मात्र राजकीय टीका न करता अनेक अपशब्द वापरून गलिच्छ राजकारण करत आहेत. भाजपाने त्यांना आवर घालावा. जर गोपीचंद पडळकर कोल्हापुरात आले तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे.