कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकातील मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठी लढा सुरू आहे. याच लढ्याला आजपर्यंत प्रा. एन. डी. पाटील यांनी तेवत ठेवला होता. कर्नाटकातील सरकार सुद्धा वारंवार सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय करत आला आहे आणि याच अन्यायाविरोधात मराठी भाषिक लढत आहेत. असे असताना कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी एक इंच सुद्धा जागा महाराष्ट्राला मिळवू देणार नाही म्हणत मराठी भाषिकांचा स्वाभिमान डीवचण्याचा प्रयन्त केला होता. त्यावर प्रा. एन. डी. पाटील यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असूनही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दम दिला होता. आज एन. डी. पाटील यांच्या जाण्याने पुन्हा एकदा तो प्रसंग समोर आला आहे.
नेमकं काय घडलं होत? -
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी, महाजन आयोगानुसार दोन राज्यातील सीमावाद संपलेला आहे. त्यामुळे सीमा वाद निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. तथापी, आम्ही महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असे येडियुरप्पा यांनी म्हटले होते. त्यांच्या त्या वक्तव्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा समाचार प्रा. एन. डी. पाटील यांनी घेतला होता.