कोल्हापूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे. त्याचबरोबर लहान बालकांसाठी राखीव बेड, पुरेसा औषधसाठा आदी वैद्यकीय सेवा-सुविधा वाढवाव्यात अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
म्युकरमायकोसिस रुग्णांकरिता 340 इंजेक्शन प्राप्त
जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने 1 हजार 500 बेड वाढवावेत, असे आदेश देऊन जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांकरीता सुमारे 340 इंजेक्शन उपलब्ध झाले असल्याचे मुश्रीफ यांना सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात 100 ऐवजी 200, मुरगुड ग्रामीण रुग्णांलयात 25 ऐवजी 50, तर कोडोली ग्रामीण रुग्णालयात 100 बेड निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच इचलकरंजीतील आयजीएम रुग्णांलयातही बेड वाढविण्यात येणार असून, सिटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.