कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. आजपर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येने सुद्धा 1 लाखांचा आकडा ओलांडला आहे. अशातच आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आपापल्या परीने कोरोनाच्या या लढाईत योध्यासारखे काम करत आहेत. दुसरीकडे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचारीसुद्धा वर्षांभरापासून न थकता जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांचा ताण थोडा कमी करावा, या हेतूने कोल्हापूरातील मॉर्निंग स्पोर्ट्स गृप समोर आला आहे. त्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुटी देऊन संपूर्ण स्मशानभूमीतील स्वच्छता करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुद्धा केले आहेत.
'मॉर्निंग स्पोर्ट्स ग्रुप'चा आदर्शवत उपक्रम
पंचगंगा स्मशानभूमी येथे गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. आता तर केवळ कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ही स्मशानभूमी राखीव ठेवण्यात आली आहे. कोल्हापूरात तब्बल 3480 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यातील 1 हजारहून अधिक मृत्यू गेल्या एका महिन्यात झाले आहेत. त्यामुळे स्मशानभूमी येथील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला असून, अनेकांनी सुट्टीही घेतली नाहीये. इथल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला कोणीही येत नाही. त्यामुळेच स्मशानभूमी येथील कर्मचाऱ्यांवर वाढलेला ताण कमी करण्याच्या हेतूने कोल्हापूरातल्या दुधाळीमधील मॉर्निंग स्पोर्ट्स गृप समोर आला आहे. शिवाय या गृपने इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवस विश्रांती देऊन, स्मशानभूमीतील सर्व स्वच्छता करून काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुद्धा केले आहेत.
मात्र 'यांनी' केलेल्या कामाचे सर्वत्र कौतूक
कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी सुद्धा यायला नकार दिल्याची उदाहरणे आहेत. अनेकजण मृतदेहांच्या जवळसुद्धा जायचे धाडस करत नाहीत. अशातच आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना एक दिवस विश्रांती दिली पाहिजे आणि त्यांची कामे आपण केली पाहिजेत, हा विचार 'मॉर्निंग स्पोर्ट्स'चे श्रीधर गाडगीळ यांनी आपल्या मित्रांनासोबत शेअर केला. गृपमधील सर्वांनीच याला तत्काळ होकार देत तसे नियोजन केले. गृपमधल्या सर्वांनीच वेळ काढून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना एक दिवस विश्रांती दिली.