कोल्हापूर - देशात कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वात आधी बरखास्त केले पाहिजे, असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला.
'कोरोना संसर्ग रोखण्यात केंद्राला अपयश; मोदी सरकारच बरखास्त केले पाहिजे'
मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या कामाचे कौतुक केले आहे. तर फडणवीसांनी राजभवनात खोली घेऊन राहायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला..
ते म्हणाले, देशासह राज्यात कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. असे असताना सर्वांनी एक होऊन कोरोनाशी लढणे अपेक्षित आहे. मात्र, अशा परिस्थितीत भाजप राजकारण करण्यात गुंतली आहे. शिवाय महाविकास आघाडीच्या विरोधात सतत तक्रारी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनात तक्रारी करण्यासाठी सतत येणे फारच लांब पडत आहे. यामध्ये त्यांचा फारच वेळ जातोय. त्यापेक्षा त्यांनी राजभवनातच एखादी खोली घेऊन राहावे, असा टोलासुद्धा मुश्रीफ यांनी फडणवीस यांना लगावला.
यावेळी मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या कामाचे कौतुक करत ते म्हणाले, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर करत आपला करारी बाणा दाखवला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुश्रीफ यांनी महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा असे म्हणणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष केले पाहिजे, अशी उपहासात्मक टीकासुद्धा मारला आहे.