कोल्हापूर - वीजबिल वसुलीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज येथील इचलकरंजी शहरातील महावितरण कार्यालय कार्यकर्त्यांनी फोडले. यामध्ये कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. काही ग्राहकांच्या घरचे विज कनेक्शन कट करण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ मनसेने फाडले महावितरणचे कार्यालय मनसेचे महावितरणला 4 दिवसांपूर्वी निवेदन- लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ व्हावे यासाठी अनेक दिवसांपासून राज्यभरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. 3 महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी आग्रही मागणी केली आहे. त्याला काही दिवसांपूर्वी ऊर्जा मंत्र्यांनी गोड बातमी देऊ असेही म्हटले होते. मात्र आता सक्तीने वीजबिल वसूल केले जात असून काहींचे कनेक्शन सुद्धा तोडण्यात आले आहे. याबाबतच 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणला वीज कनेक्शन कट केल्यास आक्रमक भुमिका घेऊ, असा इशारा दिला होता. मात्र तरीही वीजबिल सक्तीने वसूल करून कनेक्शन तोडले जात आहे. म्हणूनच संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यालय फोडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महावितरण परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.