कोल्हापूर - पक्ष, मैत्री, शब्द काय असतो हे शिवसेनेकडून शिकावे, असे गौरवोद्गार आमदार धीरज देशमुख ( MLA Dheeraj Deshmukh praised Shiv sena ) यांनी कोल्हापुरात काढले. महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित युवा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीकास्त्र सोडले. शिवाय हा देश विकायला काढला तोच देश काँग्रेसने उभा केला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रचारार्थ आयोजित युवा मेळाव्याचे दृश्य हेही वाचा -Stone Pelting At Chitra Wagh Rally : भाजपच्या कार्यकर्त्यानेच चित्रा वाघ यांच्या सभेत दगडफेक केल्याचा महाविकास आघाडीचा संशय
धीरज देशमुख यावेळी पुढे म्हणाले, कोल्हापूरच्या मातीची संस्कृती जपण्याची आपली जबाबदारी आहे. शिवाय भाजपला त्यांची जागा दाखविण्याची आता आपली जबाबदारी आहे. आम्ही जनतेच्या विकासाचा प्रश्न होता म्हणून महाराष्ट्रात एकत्र आलो आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी दिशा देण्याचे काम आपण केले आहे. कोरोना काळात सुद्धा आम्ही तळागाळापर्यंत पोहचून त्यांना संकटातून बाहेर काढण्याबाबत प्रयत्न केले. आम्ही निवडणुकीपूर्वी जे काही बोलून दाखवले ते करून दाखवले. दरम्यान, गोव्यात विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात आपण जल्लोष करता. मात्र, कोल्हापूरमध्ये निवडून येऊन दाखवा मग बोलू, आशा शब्दात त्यांनी भाजपला आव्हान दिले. तुम्ही काश्मीर फाईल्स चे सांगता मात्र गोद्रा फाईल्सचे काय? शेतकरी फाईल्सचे काय असेही ते म्हणाले.
तुमच्या भविष्याची आम्हाला आहे - रोहित पवार : रोजगार तसेच युवकांच्या समस्यांवर काय करणार असे विषय असायला पाहिजे. मात्र, वयक्तिक पातळीवर टीका करत आहात. एका महिलेवर आपण बोलता, त्यामुळे ते भाष्य तुमची विचारसरणी दाखवून देते. शाहू राजांच्या या भूमीत त्यांचे हे विचार न पटण्यासारखे आहेत. कोल्हापूरकर कधीही सुधारणार नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले, ते आम्हाला पटत नाही. जे मंदिरातसुद्धा भ्रष्टाचार करून पैसे काढतात त्यांना ही जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय सोडणार नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली.
ज्या नेत्याचा मृत्यू झाला असेल त्यांच्या पत्नीविरोधात बोलतात. एकीकडे ज्या महालक्ष्मीची पूजा करता तिकडे घरच्या लक्ष्मीची मात्र विटंबना करता? आम्ही महिला तुमच्या नाकावर टिचून जे काम करायचे आहे ते करणार. ऊस तोड असो किंवा प्लंबिंग असो आम्ही तुमच्या नाकावर टिचून स्वतःच्या पायावर उभे राहून काम करणार, अशा शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
त्या फुलांचे नाव विसरले : झोप नाहीतर गब्बर येईल, असे लहान मुलांना सांगतो, तसे आता ईडीबाबत सामान्य माणसांना भीती घातली जात आहे. हे खूपच अती होत आहे, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता 'त्या फुलाचे काय ? नाव मी विसरले' अशा शब्दात टीका केली. त्या पुढे म्हणाल्या, आमचा महाविकास आघाडीला विरोध होता. मात्र, आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणून महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र आलो. जगात एकमेव देश आहे जिथे सर्व धर्म एकत्र आहेत. मात्र, भाजप सर्वांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. निवडणूक आली की काश्मीर फाईल सारखे चित्रपट येतात. महागाईवर बोलतानासुद्धा त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लडकी हू, लढ सकती हू.. शक्ती हू, विनाश भी कर सकती हू असे म्हणत तुम्ही अजून आमचे दुर्गेचे आणि कालीचे रूप पाहिले नाही. आम्ही दाखवत नाही. मात्र, जर खोडी काढली तर गप्प बसणार नाही, असे म्हणत प्रणिती यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
अनेकजण विचारतील शिवसेनेचे कोल्हापुरात 6 आमदार होते. मात्र, आता केवळ एकच आमदार आहे. तरीही तुम्ही ज्यांनी पराभव केला त्या पक्षाच्या प्रचारासाठी आला आहात. मात्र, आमचा घात त्यांनी केला नाही, त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी आलो आहे, हेच आमचे उत्तर असेल. कारण काँग्रेस तर आमच्या विरोधात लढून निवडून आले. ते स्पर्धक होते. मात्र, घातकी मित्रापेक्षा दिलदार, तसेच विश्वासू शत्रू बरा म्हणत आम्ही विश्वास दाखवून एकत्र आलो, असे म्हणत युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी भाजपवर निशाणा साधला.
पुढे सरदेसाई यांनी चंद्रकांत पाटील यांनी सर्वसामान्य जनतेवरसुद्धा ईडी कारवाई होईल याबाबत केलेल्या वक्तव्याचासुद्धा समाचार घेत 1 हजारांचे सोडा 15 लाखांचे काय सांगा असे म्हणत टोला लगावला. शिवाय महाराष्ट्र घातकी लोकांना साथ देणार की, विकासाला महत्व देणाऱ्या महाविकास आघाडीला साथ देणार, हे ठरवा म्हणत जयश्री जाधव यांना निवडून द्या, असे ते म्हणाले.
हेही वाचा -Prakash Ambedkar criticism on BJP : भाजप मुस्लिम समाजाला उमेदवारी देत नाही - प्रकाश आंबेडकर