कोल्हापूर - उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे (Kolhapur North Bypoll) बिगुल वाजले आहेत. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यामुळे या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडूण द्यावे, अशी इच्छा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केली होती. तर या संदर्भात दोन्ही मंत्र्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी भाजप निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बिनविरोधच्या आशा आता मावळ्या आहेत. तसेच भाजपने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आयात केलेल्याला उमेदवारी दिल्याची खदखद आहे आणि याचा फायदा आम्हाला होणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
आता काँग्रेसही लवकरच आपला उमेदवार निश्चित करणार आहे. याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, जयश्री जाधव यांचे नाव आम्ही अधिकृतरित्या काँग्रेस नेतृत्वाकडे पाठवले आहे. याबाबतचा निर्णय आज किंवा उद्या जाहीर होईल. .तसेच ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेससाठीच:
कोल्हापूर उत्तरची जागा ही काँग्रेसला देण्याचे ठरले आहे. खरंतर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना हरवून निवडून आले. मात्र, त्यांचे डिसेंबर 2021 मध्ये निधन झाले आणि या जागेसाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक लढण्यास शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना पाहायला मिळाले. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री उदय सामंत यांना भेटून ही जागा काँग्रेसला देण्याचे आवाहन केले. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्याने ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.