कोल्हापूर -कोल्हापुरात येत्या दोन दिवसात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. 10 ते 14 दिवसांचा हा कडक लॉकडाऊन असणार असून यामध्ये केवळ मेडिकल आणि दूधसेवा सुरू राहणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यापूर्वी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे लॉकडाऊनला पर्याय नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. पालकमंत्री सतेज पाटील याबाबतचा निर्णय दोन दिवसात जाहीर करतील असेही त्यांनी म्हंटले आहे. कोरोना प्रतिबंध उपाययोजना आणि लसीकरणाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'कोल्हापुरात पुढच्या 2 दिवसात कडक लॉकडाऊनचा निर्णय; केवळ मेडिकल आणि दूध पुरवठा सुरू राहणार' आरटीपीसीआर रिपोर्टची वाट न पाहता उपचार सुरू करा -
कोरोनाची लक्षणे दिसताच नागरिकांनी वेळ न घालवता तात्काळ तपासणी करून घ्यावी. शिवाय त्याबाबत उपचार सुद्धा सुरुवात करावेत. रुग्णाच्या आरटीपीसीआर रिपोर्टची वाट न पाहता आधी त्याच्यावर उपचार सुरू करावेत, अशा सूचना सुद्धा आयोजित बैठकीत दिल्या असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. लहान मुलांच्या उपचारासाठी वेंटीलेटरची व्यवस्था तयार ठेवण्यात यावी आशा सूचना सुद्धा त्यांनी संबंधितांना दिल्या. या बैठकीमध्ये आमदार राजेश पाटील, महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी आदी उपस्थित होते.
मृत्युदर रोखण्यासाठी जे शक्य आहे ते करा -
कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातला मृत्यु दर कसा रोखता येईल त्यासाठी आवश्यक त्या सर्वच गोष्टी करा. शिवाय सर्वांनीच सद्या सुरू असलेल्या संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करावे. असे सांगत त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन तसेच अँटीजेन टेस्ट किट ची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल असेही सांगितले. बैठकीदरम्यान मुश्रीफ यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे आदींशी मोबाईलवरून संपर्क साधला.