कोल्हापूर - गेल्या चौदा दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांमध्ये बदल करा अशी शेतकरी मागणी करत आहेत. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यायला तयार नाही. वरून भाजपचे रावसाहेब दानवे यांनी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल चुकीचे वक्तव्य केले. अशा लोकांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भुईसपाट केले पाहिजे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विधानपरिषदेचे पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड आणि जयंत असगावकर यांच्या सत्कार समारंभाचे कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होते. यावेळी मुश्रीफ बोलत होते.
आशा लोकांना भुईसपाटच केले पाहिजे; मुश्रीफ यांचा भाजपवर हल्लाबोल आंदोलनं कशी करावी हे 'त्या' शेतकऱ्यांच्या संघटनांकडून शिकावे -गेल्या 14 दिवसांपासून दिल्लीमध्ये पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही त्यांनी माघार घेतली नाही. तिथेच ठाण मांडून आहेत. आंदोलनं कशी करावी हे त्या सर्व शेतकऱ्यांच्याकडून आणि तिथल्या संघटनांकडून शिकले पाहिजे असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले. शिवाय त्यांचे कौतुक करत आपणही त्यांना पाठिंबा देऊयात असेही मुश्रीफ यांनी म्हंटले.
आज दिवस चांगला; चंद्रकांत दादांचे नाव नाही घेणार -यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. ते म्हणाले, आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात त्यांचे नाव घेऊन कार्यक्रमाला गालबोट लावणार नाही. मात्र त्यांना वारंवार सांगत होतो की सत्तेची सूज आहे त्यामुळे लोकं येत आहेत. मात्र, खरी परिस्थिती येते तेंव्हा जिवाभावाची लोक लागतात. ती कमवायची असतील तर लोकांमध्ये जाऊन काम करावे लागते. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत लोकांची सेवा करावी लागते. पैसे देऊन लोकं येतील पण ते केवळ एक दिवस पण जिवाभावाची लोक मिळणार नाहीत असा टोला सुद्धा मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.