कोल्हापूर - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांकडून चौकशी पार पडली. मात्र याला भाजपाकडून मोठा विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाला एवढा विरोध करायची गरज नाही, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. एका बाजूला ईडी सारखे केंद्रीय संस्था बेकायदेशीररित्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करतात तेव्हा ते काही बोलत नाहीत. दुसऱ्या बाजूला साध्या पोलीस चौकशीला एवढा विरोध कशाला? असा सवालही भुजबळांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
'दाऊद पाच लाखांचे पान खाऊन थुंकत असेल'
भाजपाकडून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. पण नवाब मलिक यांचा राजीनामा का घ्यावा? असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. त्यांच्यावर भाजपा अन्याय करत आहे आणि त्यात आम्ही राजीनामा घेऊन अजून अन्याय का करू? कोर्टात केस चालू आहे. सुरवातीलाच चुका करत ५५ लाख नसून ५ लाखाचा व्यवहार झाला आहे म्हणाले. ५ लाखासाठी थेट दाऊदशी संबंध जोडत आहात तिकडे दाऊद पाच लाखांचे पान खाऊन थुंकत असेल. मात्र येथे नवाब मलिकांच्यावर विनाकारण आरोप लावून त्यांना आत टाकले जात असल्याचे त्यानी म्हटले आहे. तसेच यापूर्वीही पवारांवर आरोप करत ट्रकभर पुरावे असल्याचे विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत होते. मात्र ट्रक भर तरी नाही किमान एक फाईल तरी घेऊन या, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.