कोल्हापूर -पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना काल शुक्रवारी वीरमरण आले आहे. ही बातमी गावामध्ये कळताच ऐन दिवाळीत गावावर शोककळा पसरली आहे. उद्या ऋषिकेश यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ऋषिकेश ज्या शाळेत शिकले त्याच शाळेच्या आवारातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सकाळपासून गावात अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे. ऋषिकेश जोंधळे हे दोन वर्षांपूर्वी सैन्यामध्ये भरती झाले होते. त्यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू-काश्मीर या ठिकाणी झाली. एकुलता एक असलेल्या ऋषिकेश यांना अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय पाकिस्तानला भारत सरकारने सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचा संताप देखील नागरिकांमधून व्यक्त होतोय.
जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार आज सायंकाळपर्यंत पार्थिव पुण्यामध्ये येण्याची शक्यता-
कोल्हापूर जिल्ह्याचे सैनिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव बहिरेवाडीमध्ये किती वाजता येईल. याची अधिकृत माहिती मिळाली नाही. तरी पार्थिव सायंकाळपर्यंत पुण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. शिवाय उद्या सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असेही त्यांनी म्हंटले आहे.
गावातील बहिरेश्वर हायस्कुलच्या मैदानावर होणार अंत्यसंस्कार-
ऋषीकेश जोंधळे ज्या शाळेत शिकले. त्या शाळेच्या मैदानवरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गावातील सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, आदी सर्वच नागरिकांनी अंत्यविधीसाठी एकवटले असून शाळेच्या मैदानाची स्वच्छता करून घेतली आहे.
गावात दुखवटा-
गावातील एका तरुण मुलाला वीरमरण आल्याने आम्हा सर्वांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय ऋषीकेशचा आम्हाला अभिमान सुद्धा वाटत आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात गावच नाही तर संपूर्ण देश शहभागी असल्याचे गावकऱ्यांनी म्हंटले आहे. तसेच गावात एकाही घरात दिवाळी साजरी होत नसून दिवाळीमध्ये दुखवटा जाहीर करण्यात आला. असे पोलीस पाटील, सुरेश खोत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-सोलापूर-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात; एकाच कुटुंबातील 3 ठार, 13 जण जखमी
हेही वाचा-सालेकसा पोलिसांच्या वाहनाला अपघात; पोलीस शिपायाचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी