कोल्हापूर -मराठा आरक्षणाबाबत उद्या (बुधवारी) कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मूक आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजातील समन्वयक सुद्धा येणार आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनावेळी मराठा समाजातील कोणीही बोलणार नाही. केवळ जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी आपली भूमिका मांडायची आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संभाजीराजेंशी खास संवाद साधला आहे.
खासदार संभाजीराजेंशी ईटीव्ही भारतने साधलेला खास संवाद 'जिल्ह्यातील नेत्यांनी उद्या आपली भूमिका मांडावी आणि आपण काय करणार हे सांगावे' यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संभाजीराजे म्हणाले, समाज बोलला आहे, आम्ही बोललो आहे. आता सर्वच आमदार खासदार आणि मंत्र्यांनी बोलायची गरज आहे. आरक्षणाबाबत आपली काय भूमिका आहे, तुम्ही काय करणार आहात हे सांगणे गरजेचे आहे. जर या लोकप्रतिनिधींना इच्छाशक्ती दाखवली तर निश्चितच सर्व शक्य होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आहेच, पण ज्या पाच मागण्या केल्या आहेत, त्या कशा मार्गी लावणार हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
'उदयनराजेंनी प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा दिला आहे'
नुकतीच संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट झाली. त्यानंतर आपली भूमिका मांडताना उदयनराजे यांनी प्रत्यक्ष जरी आंदोलनात सहभागी होणार नसले, तरी संभाजीराजेंच्या प्रत्येक आंदोलनाला मनापासून पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. याबाबतच विचारले असता संभाजीराजे म्हणाले, यापुढे सुद्धा काही आंदोलन करायची वेळ आली किंवा लॉंग मार्च काढावा लागला, तर तेंव्हाही उदयनराजेंचा जाहीर पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दोघांच्या भेटीनंतर संभाजीराजेंच्या या आंदोलनाला अधिकच ताकद मिळाली आहे.
'सदावर्ते यांच्यावर मी काय बोलणार'
दोन दिवसापूर्वी संभाजीराजेंनी नक्षलवादी संघटनांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आवाहन केले होते. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. शिवाय हे कृत्य योग्य नसून संभाजीराजे आणि उदयनराजे यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली पाहिजे, असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता ते खूप मोठे आहे त्यांच्याबाबत मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी व्यक्त केली.
संभाजीराजेंकडून आंदोलनस्थळाची पाहणी
दरम्यान, उद्या (बुधवारी) होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारक ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शिवाय उद्याच्या सर्व नियोजनाबाबत कोल्हापुरातील मराठा समाजातील समन्वयकांशी चर्चा केली. विशेष म्हणजे हे केवळ मूक आंदोलन आहे, मोर्चा नाही शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव सुद्धा रोखायचा आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन सुद्धा करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी? नारायण राणेसह, अजून कोणाच्या नावाची चर्चा?