कोल्हापूर - पक्ष सोडून जर कोणताही नेता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी होणार असेल, तर त्यांचे स्वागत करणार असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातील नेता असो, त्यांनी आपला पक्ष बाजूला ठेऊन आरक्षणासाठी लढायला यावे, असे आवाहन मराठा नेत्यांनी केले आहे.
सकल मराठा समाज : 'पक्ष सोडून कोणत्याही नेत्यांनी आमच्यासोबत यावं' आरक्षणासाठी भाजपाने नेतृत्व करण्यासंबंधी मराठा समाजाने हिरवा कंदील दिला, तर सरकारला सळो की पळो करून सोडू, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला सकल मराठा समाजाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आपण पक्ष सोडून आंदोलनात सहभागी व्हा, आपले स्वागत असेल, असे सकल मराठा समाजाने सांगितले.
'एमएसईबी'च्या प्रत्येक कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन पुकारणार
मराठा समाजाला वगळून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला विरोध करण्यासाठी आता सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही मराठा समाजाकडून सांगण्यात आले असून सरकारला आमच्या प्रश्नांची दखल घ्यावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंत्रालयावर मोर्चा काढणार
रविवारी पुण्यातील बैठकीत आठ डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचे मराठा समाजाने सांगितले आहे. या आंदोलनात कोल्हापुरातील मराठा समाज हजारोंच्या संख्येने मुंबईला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकजण स्वतःच्या गाड्या घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.