कोल्हापूर -सर्वसामान्य नागरिकांकडून बळजबरीने वीजबिल वसूल करत असाल तर याद राखा! गरीबावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून वीज बिल वसूल करत असाल तर सहन केले जाणार नाही. राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर शाहू घराण्यावर गुन्हा नोंद करून दाखवावा, अंगावर केसेस घ्यायाला तयार आहोत, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला. आज कृती समितीने महावितरण कार्यालयाला घेराव घातला त्यावेळी ते बोलत होते.
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील वीज माफ करावे अशी मागणी कृती समितीने केली आहे. मात्र, राज्य सरकारने दिशाभूल करत या मागणीला धुडकावून लावल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. अधिवेशनाच्या सुरवातीला वीज तोडणीला स्थगिती दिली व अधिवेशन संपताच ही स्थगिती उठवण्यात आली, याचा निषेध करण्यासाठी आज कृती समितीने ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर गोंधळ घातला. जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आक्रमक झालेल्या कृती समितीने अभियंता निर्मळे यांना आंदोलन स्थळी बोलावून आमची मागणी स्वीकारावी अशी मागणी उचलून धरली. त्यावर निर्मळे यांनी आंदोलन स्थळी येऊन हे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नगरसेवक सत्यजित कदम, सुनील कदम, निवास साळुंखे, बाबा पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांचा निषेध करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.