कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बहुमत असेल तर या राज्याचा मुख्यमंत्री तृतीयपंथी सुद्धा होऊ शकतो असे वक्तव्य केले होते मात्र प्रत्यक्षात राजकारणात असे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले नाही. राजकारणामध्ये नेहमीच तृतीयपंथी यांना संघर्ष करावा लागला आहे. मात्र संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत (Hupari Nagar Parishad) घडली आहे, कारण या नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले (First Transgender Corporator In Kolhapur) आहे. तातोबा बाबूराव हांडे (Tatoba Baburao Hande) असे या नूतन तृतीयपंथी नगरसेवक चे नाव आहे. आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ताराराणी आघाडीने (Tararani Aghadi) त्यांना हा हांडे यांना हा बहुमान दिला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या.
2017 साली झालेल्या निवडणुकीत छाननी मध्ये अर्ज बाद झाला :दरम्यान, हुपरी मधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या तृतीयपंथी तातोबा हांडे यांना मानणारा मोठा वर्ग गावात आहे. आजपर्यंत जोगवा मागून, कार्यक्रम करून त्यांनी आपले आयुष्य घालवले आहे. मात्र आता ते थेट नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून पोहोचले आहेत. खरंतर हुपरी मध्ये नगरपरिषदेची मान्यता मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका जाहीर झाल्या. यामध्ये आमदार प्रकाश आवडे यांच्या ताराराणी आघाडीकडून तातोबा हांडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक गोष्टीमुळे हांडे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरला. मात्र त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी शब्द दिला होता की, सत्ता आल्यानंतर आपण हांडे यांना स्वीकृत नगरसेवक करणार. त्यामुळे आता प्रकाश बावचे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आमदार प्रकाश आवडे तसेच राहुल आवडे यांनी हांडे यांना स्वीकृत नगरसेवक पद देऊन त्यांचा सन्मान केला. राज्यात तर आजपर्यंत असा निर्णय घेतला गेला नाहीच पण देशभरात सुद्धा आशा पद्धतीने कुठे निर्णय घेतला गेला नसल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक निवडीनंतर स्वतः ताराराणी पक्षाचे नेते राहुल आवाडे यांनी तातोबा हांडे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवाय त्यांच्या हातून यापुढे मोठ्या प्रमाणात समाजकार्य घडावे आशा शुभेच्छा सुद्धा दिल्या.