कोल्हापूर - राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची आज शिरोळ निवासस्थानी भेट घेतली. गणेश देवी देशातील अनेकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आता दक्षिण भारतातील चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी शेट्टींची भेट घेतली.
महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशामध्ये मजबूत चळवळ उभी केली. याच दिवसाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी दक्षिण भारतातील शेतकरी व डाव्या विचारसरणीच्या लोकांची भेटी घेत आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. त्यांनी देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, मच्छीमार या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्रित पणे लढा उभा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.