कोल्हापूर -गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचा सुद्धा विचार व्हायला हवा यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या गणेशमूर्ती न वापरण्याबाबत सुद्धा सांगण्यात येते. यालाच प्रतिसाद देत गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती Eco Friendly Ganesha Idol Kolhapur बनत आल्या आहेत. यामध्ये शाडू, मातीपासून किंवा कागदी लगद्यापासून मूर्ती बनलेल्या पाहिल्या आहेत. एवढेच काय तर गाईच्या शेणापासून सुद्धा गणेशमूर्ती बनल्या आहेत. मात्र कोल्हापुरातल्या पाचगाव येथे राहणाऱ्या मूर्तीकाराने शाडू, कागदाचा लगदा ते चक्क पाला पाचोळा आणि गवतापासून गणेशमूर्ती साकारल्या असल्याचे म्हटले आहे. शिवाय गणेशमूर्तीसोबत त्या प्रत्येक ग्राहकाला एक झाडाचे रोप सुद्धा भेट देत आहेत. गुणकली भोसले असे या मूर्तीकाराचे नाव आहे.
झाडांची पडलेली पानं, पाला पाचोळा अन् गावतापासून बनलेला बाप्पा :कोल्हापुरातल्या पाचगाव येथे राहणाऱ्या गुणकली भोसले यांचा परिवार गेल्या 6 ते 7 पिड्यांपासून कला क्षेत्रात काम करत आहेत. गुणकली स्वतः एक सतार वादक आहेत. मात्र रंगकामाची आवड असल्याने त्यांनी आपल्या वडिलांना गणेशमूर्ती बनविण्याबाबत कल्पना बोलून दाखवली आणि 15 ते 16 वर्षांपूर्वी त्यांनी वडिलांसोबत आपल्या घरी दरवर्षी गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली. या मूर्ती बनवत असताना त्यांनी पर्यावरणाचा नेहमीच विचार केला आहे. त्यांनी आजपर्यंत शाडूच्या आणि विविध मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या आहेत. शिवाय काही वर्षांपासून यांनी कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनविल्या आहेत. घरातच सर्व कुटुंबीय मिळून त्या सर्व मूर्ती साकारतात. यामध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी वेगळं करायचे असे ठरवले आणि पाला पाचोळा, झाडांची पडलेली पानं तसेच गावतापासून गणेशमूर्ती साकारू शकतो हे करून दाखवले. गेल्या 2 ते 4 वर्षांपासून त्या शाडूच्या मूर्ती सोबतच अशा मूर्ती बनवत आहेत. या मूर्ती बनविण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे सध्या कमी प्रमाणात त्यांनी या साकारल्या आहेत. मात्र भविष्यात यापेक्षाही अधिक मूर्ती बनविण्याबाबत त्यांनी ठरवले आहे.