कोल्हापूर-महिषासुरमर्दिनी, आदिशक्ती दुर्गेची उपासना करणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी सज्ज झाली आहेत.
अंबाबाई मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आजपासून (७ ऑक्टोबर) नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. भाविकांसाठी ऑनलाईन पासद्वारे दर्शनाची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी नियम पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री अंबाबाईसह ज्योतिबा मंदिर सज्ज हेही वाचा-VIDEO : 7 ऑक्टोबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
जिल्हा प्रशासनाने तयारीचा घेतला आढावा-
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी अंबाबाई मंदिराची पाहणी केली. दर्शन रांग भाविकांना सॅनिटायझर करून आत घेणे. यासंबंधीच्या सूचना मंदिर प्रशासनाच्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच मंदिर परिसरातील महाद्वार रोड परिसर, घाटी दरवाजा परिसर, पूर्व दरवाजा परिसर याची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला.
श्री अंबाबाईसह ज्योतिबा मंदिर सज्ज हेही वाचा-श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे तयारी पूर्ण; उद्या पहाटे 5 वाजता उघडणार मंदिर
भाविकानां असे मिळणार दर्शन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाई व दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाइन पासच्या माध्यमातून दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून या ऑनलाईन दर्शनासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवसभरकरिता जवळपास वीस हजारपेक्षा जास्त भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. भाविकांसाठी पुढील तीन दिवस ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेला संदेश क्यू आर कोड, ई-पास क्रमांक द्वारे तपासणी केल्यानंतर भाविकांना श्री आंबाबाईचा आणि ज्योतिबाचे दर्शन मिळणार आहे. भाविकांना या वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे लागणार आहे.
हेही वाचा-यंदा नवरात्रीचा सण आठ दिवसांचा; पंचागकर्त्यांनी 'हे' सांगितले कारण
पार्किंगची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट व्हॅन, पाण्याची सोय
नवरात्र उत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यसह देशभरातून भाविक येत असतात. दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून आंबाबाईच्या भक्तांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी गांधी मैदान, शिवाजी स्टेडियम, शाहू स्टेडियम पूर्व बाजू, दसरा चौक, प्रायव्हेट हायस्कूल, पेटाळा पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, पंचगंगा नदी घाट, खानविलकर पेट्रोल पंप शेजारी,निर्माण चौक, शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी सूचना देण्यासाठी लावून स्पीकर, मोबाईल टॉयलेट व्हॅन आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
शहरात दहा ठिकाणी लाईव्ह दर्शन
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांसाठी प्रशासनाकडून लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आली आहे. जागोजागी दहा ठिकाणी स्क्रीन लावण्यात आली आहे. श्री अंबाबाई मंदिरदक्षिण दरवाजा, ज्योतिबा रोड, बिंनखांबी गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, उभा मारूती चौक, शिवाजी पेठ, बागल चौक, शाहू मिल, गंगावेश, मिरजकर तिकटी, क्रेशर चौक, साने गुरुजी रोड, राजारामपुरी, जनता बाजार चौक, आदी ठिकाणी लाइव्ह दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे.
वाडी रत्नागिरीवरील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांना पास बंधनकारक केला आहे. ऑनलाईन ई पास बंधनकारक आहे. येणाऱ्या भाविकांना सोबत आधार कार्ड ठेवणे गरजेचे आहे.
तीन तासात 15 हजार भाविकांची नोंदणी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनासाठी ई-पास बंधनकारक केला आहे. याची नोंदणी आज सकाळपासून अकरा वाजता सुरू झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत 15 हजार भाविकांनी नोंद केली आहे.
काय आहे नियमावली?
- दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही पास बंधनकारक आहे. e-pass असणाऱ्यानी त्याचा संदेश असलेला मोबाईल व आधार कार्ड सोबत ठेवावे.
- एकाच पासवर नोंदणी केलेल्या सर्व भाविकांनी एकत्रच दर्शनासाठी यावे.
- 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, दहा वर्षावरील मुले, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना दर्शनासाठी मनाई आहे. शिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
- भाविकांना दर्शनासाठी येताना मंदिरात साडी, ओटी, नारळ, तेल, पूजेचे साहित्य तसेच कोणतेही सामान आणता येणार नाही.
- मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतरासाठी सहा फुटाचे अंतर बंधनकारक केले आहे.