कोल्हापूर - मुसळधार पावसात सुद्धा आरोग्य सेविका जिल्ह्यातील प्रत्येक वड्या वस्त्यांपर्यंत जाऊन लसीकरणाची काम करत असतात. आजरा तालुक्यात सुद्धा असाच एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी घनदाट जंगलातून आणि पाण्याच्या मोठ्या लोंढ्यामधून वाट काढत लसीकरणासाठी जात असताना दिसत ( Vaccination Video Health Worker In Kolhapur ) होत्या. त्यांच्या या व्हिडिओ नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांची कामावरील निष्ठा आणि घ्यावे लागत असलेले परिश्रम सर्वांना पाहायला मिळालेच. मात्र, दुसरीकडे भारतात स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी जायला साधा रस्ता नाही?, हा प्रश्न सुद्धा समोर आला होता. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने चार दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह देशातील सर्व भाषांमध्ये 'ईटीव्ही भारत'ने हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच थेट या धनगरवाड्याला भेट ( Zilla Parishad CEO Visited Dhangarwada Village Ajara Taluka ) दिली. शिवाय इथल्या नागरिकांच्या असलेल्या अनेक समस्या सुद्धा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.
...अन् त्या व्हिडिओनंतर थेट अधिकारी वस्तीवर - कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना धनगवाड्यातील समस्येबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी थेट गावाला भेट द्यायचे ठरवलं. त्यानुसार रविवारी ( 17 जुलै ) या छोट्या धनगरवाड्यावर ते पोहोचले. इथल्या नागरिकांशी त्यांनी बऱ्याच वेळा चर्चा केली. त्यांचे अनेक प्रश्न जाणून घेतले. ते ज्या परिस्थितीत इथं राहतात त्याची माहिती घेतली. आपण स्वतः या परिसरात पूर्वी प्रांताधिकारी होतो, असे सांगत त्यांनी नक्कीच या सर्व समस्येबाबत थोडी कल्पना होतीच. मात्र, आता याबाबत काहीतरी उपाययोजना करू, अशी ग्वाही सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येथील नागरिकांना दिली आहे.
'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा' -यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या धनगरवाड्यावर पोहोचताच तिथली परिस्थिती जाणून घेतली. शिवाय आता केवळ कागदी घोडे नाचवून काहीही उपयोग नाही. यावर नक्कीच उपाययोजना करणे गरजेचे असून, याबाबत आपण स्वतः लक्ष घालणार आहे. सर्वच प्रश्न लगेचच सुटतील असे नाही. पण, प्राधान्याने कामे हाती घेऊ, असेही त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कणा कवितेची आठवण करत 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा', या कवीतेप्रमाणे या लोकांना फक्त पाठीवर हात ठेवून त्यांना लढण्याची ताकद देण्याची गरज असल्याचेही संजयसिंह चव्हाण यांनी सांगितलं. प्रशासन नेहमीच संवेदनशीलपणे यांच्या पाठीवर हात ठेवून पुढे आले, तर यांना लढण्यासाठी अधिक बळ मिळेल. त्यामुळे कागदी घोडे न नाचवता प्रशासन यापुढे नक्कीच त्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवेल, असे आश्वासन त्यांनी दिले.