कोल्हापूर - केंद्र सरकारने आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या सर्वच युवकांसाठी नुकतीच एक अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेला तरुणांकडून विरोध होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे सरकारने तरुणांसाठी जास्तीत जास्त नोकऱ्यांसाठी चांगला विचार केला आहे, मात्र दुसरीकडे केवळ चार वर्षे सेवा देण्यासाठी कोण तयार होईल, असा सवाल सुद्धा तरुणांनी केला आहे.
हेही वाचा -Vat Pornima : वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष लागवड; घरी आणलेल्या वडाच्या फांदीचे घरीच 'असे' करा रोप
वयाची अट वाढवून द्यावी - अनेक तरुण तर गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आर्मी भरतीची तयारी करत आहेत. त्यात अनेक वेळा भरतीची प्रक्रिया पुढे ढकलली. दोन वर्षांपासून भरतीच झाली नसल्याने तरुण प्रचंड नैराश्येमध्ये आहेत. त्यामुळे, आता या नव्या योजनेत जी मुले तयारी करत होते ते सुद्धा बसत नाहीयेत. त्यामुळे, या नियमांमध्ये सुधारणा करावी. तसेच, जास्तीत जास्त मुलांना याचा कसा फायदा होईल याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी तरुणांनी केली.
चार वर्षांनंतर पुढे काय ? - अग्निपथ योजनेला विरोध करताना तरुण सांगतात की, जर आम्ही आता 21 व्या वर्षी यामध्ये भरती झालो तर वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत सेवेची संधी मिळणार, मात्र वयाच्या 25 नंतर इतर भरतीची सुद्धा वयाची अट असणार, त्यामुळे त्यामध्ये आम्ही पात्र नसणार. शिवाय चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? असा सवाल सुद्धा तरुणांनी केला.
काय आहे अग्निपथ योजना ? - सैन्य भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी सरकारने नव्या मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या भरतीला 'अग्निपथ भरती योजना' असे नाव देण्यात आले आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना केवळ 4 वर्षांसाठी देशसेवेसाठी घेतले जाणार असून त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार असल्याची माहिती आहे. केवळ चार वर्षांसाठी हे कंत्राट असणार आहे.
हेही वाचा -अबब..! एकाच दुकानात आढळला दीड टन प्लास्टिक; संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर प्लास्टिक जप्त