कोल्हापूर- घटस्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून राज्यातील सर्वच मंदिर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शक सूचना भाविकांना काटेकोरपणे पाळाव्या लागतील. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर करण्यात येतील,अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर होणार खुले-
गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. त्याप्रमाणे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर्च्या अंबाबाईचे मंदिर उघडण्यापूर्वी भाविकांसाठी नियमावली जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले.
अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी होणार खुले; घटस्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून राज्यातील सर्वच मंदिरे सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही अशी संभाव्य खबरदारी घेत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी एक समजल्या जाणाऱ्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने देखील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले आहेत.
ओटी, प्रसाद, नारळाला बंदी-
कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करत सर्व भक्तांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. पूर्व दरवाज्यातून भक्तांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जाणार आहे. त्यानंतर देवीचे दर्शन झाल्यानंतर भाविकांना दक्षिण दरवाजातून बाहेर पाठवले जाणार आहे. अंबाबाई मंदिरात ओटी, प्रसाद आणि देवीला साडी आणि त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरुवातीला सकाळी सहा ते संध्याकाळी सात पर्यंत खुले ठेवले जाणार आहे. या दरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी भक्तांसाठी सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे।. लवकरच याबाबत लेखी आदेश काढला जेल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
विरोधकांनी केला होता घंटा नाद-
राज्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, दारुची दुकाने, मॉल्स आदी सुरू करण्यात आल्यानंतर मंदिरे मात्र बंदच होती. त्यामुळे मंदिर उघडण्याची मागणी करत विरोधकांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते. भाजप, मनसे या राजकीय पक्षांबरोबरच अनेक संघटनांनी मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारविरोधात घंटानाद आंदोलने देखील केली. गणेशोत्सवाच्या काळातही मंदिरे सुरू करण्यात आली नव्हती. मात्र टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडली जाणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतरच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने आज राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याची नियमावली लागू करत कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर उघडले जाणार आहे.
हेहीवाचा - साईंची शिर्डी : कोरोनापूर्वी आणि नंतरची
हेही वाचा -अंबाबाई मंदिर सुरू होईपर्यंत व्यवसाय असून नसल्यासारखा; कोल्हापुरातील व्यवसायिकांच्या भावना