कोल्हापूर - शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक ( Mp sanjay Mandlik ) हे सुद्धा आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हमीदवाडा येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात याबाबत ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असून, संजय मंडलिक यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे ते शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा असताना त्याचे खंडनही करण्यात आलं नाही. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना खरा शिवसैनिक कधीही उद्धव ठाकरे यांना सोडून बाजूला जाणार नाही, असे संजय मंडलिक यांनी म्हटलं होते. त्यामुळे खासदार मंडलिक आपल्या शब्दावर ठाण राहणार की शिंदे गटात ( Eknath Shinde Group ) दाखल होणार हे पाहावे लागणार आहे.
हमीदवाडा येथे शिवसनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा - खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा आज ( 17 जुलै ) हमीदवाडा येथे मेळावा पार पडला. यामध्ये संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक सुद्धा उपस्थित होते. या मेळाव्यात मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर जायला पाहिजे याबाबत चर्चा झाली. शिवाय कार्यकर्त्यांनी सुद्धा याबाबत जोर लावला. पण, याबाबत अधिकृत निर्णय संजय मंडलिक काय घेणार हे पाहावे लागणार आहे. मंडलिक हे दिल्ली येथे आहेत. दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे पार पडलेल्या बैठकीत ते उपस्थित नव्हते. मात्र, त्यानंतर कोल्हापूरात पार पडलेल्या बैठकीत ते उपस्थित होते.