कोल्हापूर - एसटी कर्मचार्यांच्या संपाचा खासगी वाहतूकदारांकडून गैरफायदा उठवला जात असल्याचा प्रकार आता समोर येत आहे. एसटी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी आता खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे खासगी वाहतूकदारांनीसुद्धा तिकिटांचे दर दुप्पटीने, टिप्पतीने वाढवले आहेत. याबाबतच्या माहिती मिळताच आता प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. शिवाय जादा दर आकारणाऱ्यांवर परवाना रद्दची कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे.
चार वेगवेगळी पथके तयार; दररोज बस स्थानक परिसरात असणार तैनात
खासगी वाहतूकदारांकडून सुरू असलेले लूट पाहून प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी आपल्या कार्यालयातील चार वेगवेगळी पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून कोल्हापुरात ज्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी खासगी बस वाहतूक सुरू असते, त्या ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी जादा दराने तिकीट विक्री सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. वेळ पडल्यास संबंधितांचे परवानेसुद्धा रद्दची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट; प्रवाशांच्या तक्रारी
राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर असल्याने बस वाहतूक ठप्प आहे. याचा गैरफायदा अनेक ठिकाणचे खासगी वाहतूकदार घेत आहेत. कोल्हापुरातील काही खासगी वाहतूकदारसुद्धा एससटी कर्मचार्यांच्या संपाचा गैरफायदा घेत असून पाचशे रुपयांचे तिकीट पंधराशे रुपयांपर्यंत विक्री केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट सुरू असून त्याला वेळीच आळा बसावा, म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यानुसार ही कारवाई होणार आहे.