कोल्हापूर -कोल्हापूर महानगरपालिकेचा २०२१-२०२२चा अंदाज अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. हेरिटेज वास्तू संवर्धन, पर्यटनस्थळे, महिला स्वच्छतागृह, आयटी पार्क, आरोग्य सुविधा, पंचगंगा प्रदूषण रोखणे, यासह अन्य विकास कामांसाठी १ हजार ८५ कोटी ४८ लाख इतका अंदाजीय अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त बलकवडे यांनी सांगितले.
सभागृहाची मुदत संपली
कोल्हापूर महानगरपालिकेचे आज २०२१-२२चे अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने यंदा प्रशासकीय अधिकारी आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यंदाचा अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांवर पाणीपट्टीचा अधिक भार लावण्यात आला आहे. २० हजार लिटर पर्यंत पाणीपट्टी वर कोणताही वाढीव भार नसणार आहे. २१ हजार लिटरपासून पुढे चाळीस हजार लिटरपर्यंत हजार लिटरमागे दीड रुपयाची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त बलकवडे यांनी दिली. दरम्यान, या अर्थसंकल्पात १ हजार ८५ कोटी ४८ लाख इतक्या रकमेचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, हेरिटेज वास्तू संवर्धन, हेरिटेज वॉक, पर्यटन स्थळे विकास कामासाठी भर देण्यात आला आहे. तसेच शहरातील उद्यानांचा विकास, सेंसरी गार्डन, हरित पट्टे वने विकसित करणे यावर भर देण्यात आला आहे.
सर्वांगीण विकासासाठी योजना
शहराच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अंदाजपत्रकात एक कोटीची तरतूद आयटी पार्क विकसित करण्यासाठी करण्यात आली आहे. शहर पाणीपुरवठा योजना वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी, पाणीगळतीसाठी स्वतंत्र लिकेज डिटेक्शन प्रोग्रॅम राबवणे प्रस्तावित करण्यात आले आहे. कोटीतीर्थ तलाव पुनर्जीवित, अग्निशामक यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी तसेच हॉस्पिटलमधील आग प्रतिबंधक उपाय योजनेसाठी अद्यावत अग्निशामक यंत्रणा बसवणेबाबत या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकातील आराखड्याप्रमाणे उर्वरित कामे पूर्ण होणार
कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडाच्या प्रथम टप्प्यातील रक्कम ६९ कोटी ९६ लाख रुपयांच्या कामांना राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर प्रशासकीय मान्यतेनुसार पहिल्या टप्प्यातील ८ कोटी २० लाख रुपये निधी कोल्हापूर महानगरपालिकेस प्राप्त झाला आहे. शहरात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना पार्किंग सुविधा पुरवण्यासाठी सरस्वती चित्रपट ग्रह शेजारी कोल्हापूर महानगरपालिका बहुमजली पार्किंग उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित निधी अंदाजपत्रकातील आराखड्याप्रमाणे उर्वरित कामे पूर्ण करण्याचा मानस अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.
अंदाज पत्रकातील प्रस्तावित प्रकल्प
- -महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे- १ कोटी
- -हेरिटेज वास्तू संवर्धन/हेरिटेज वॉक-१ कोटी
- -सेंट्रल पब्लिक अनसिंग सिस्टीम-२० लाख
- -उद्यान विकास, सेंसरी गार्डन, वने विकसित करणे-५० लाख
- -सफाई सुरक्षा अभियान-३० लाख
- -आयटी पार्क विकसित करणे-१ कोटी
- -पाणीपुरवठा लिकेज डिटेक्शन प्रोग्रॅम -२५ लाख
- -हरित पट्टे हरित शहर-४ कोटी ७० लाख
- -प्लास्टिक कलेक्शन आणि रिसायकल प्रोसेसिंग-५० लाख
- -कोटीतीर्थ तलाव पुनर्जीविकीकरण-३ कोटी ५० लाख
- -प्राथमिक शाळा स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट-१५ लाख
- -आपत्कालीन व्यवस्थापनासाठी साधनसामुग्री खरेदी-४० लाख
- -ट्रॅफिक सिग्नल सिंक्रो सजेशन ट्रॅफिक व्यवस्थापन-१ कोटी
- -महापालिका प्रशासकीय इमारत -१ कोटी ५० लाख
- -अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत प्रकल्प-३० लाख
- -क्रीडा विषयक बाबींसाठी उत्तेजन, क्रीडास्पर्धा- ३७ लाख
- -अग्निशमन यंत्रणा टर्न टेबल लेंडर -११ कोटी
- -ई-गव्हर्नन्स डिजिटायझेशन-५ कोटी
- -महापालिका मोबाइल ॲप सोशल मीडिया-१० लाख
- -झोपडपट्टी येथे दवाखाना सुविधा देणे-२० लाख
- -करवीर दर्शन बस -२५ लाख
- -ॲनिमल रेस्क्यू शेल्टर-२० लाख
- -मनपा कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी हेल्थ कार्ड योजना-१५ लाख
- -फेरीवाला झोन सुविधा -२० लाख
- -मनपा स्पर्धा परीक्षा केंद्र अद्यावत करणे-१५ लाख
- -आरोग्य सुविधा बळकटीकरण-१ कोटी ६० लाख
- -ग्रेड सेपरेशन पद्माराजे स्कूल-२ कोटी
- -फुटपाथ करणे दुरुस्ती करणे-३० लाख
- -मेन हॉल बसवणे दुरुस्ती करणे-३० लाख
- -हॅकेथॉन व आर व्ही आर लॅब-१० लाख
- -कोल्हापूर महोत्सव -२० लाख
- -हवा प्रदूषण नियंत्रण-२५ कोटी
- -केशवराव भोसले नाट्यगृह देखभाल-दुरुस्ती-२५ लाख