कोल्हापूर -शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या फुलेवाडी रिंगरोड वरील पाईप लाईन व इतर पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर लिटर पाण्याची नासाडी होत आहे. बहुतांश भागात रात्रीचा पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊन देखील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. असा आरोप नागरिकांनी केला आहे. याचा परिणाम याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर होत असल्याने जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या फुलेवाडी रिंगरोड पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. क्रांतीसिंह नाना पाटील नगर, फुलेवाडी, बोन्द्रेनगर अशा विविध भागांत पाण्याची समस्या जटिल होत असतानाच पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी फुलेवाडी रिंगरोडवरील शिंगणापूर पाईपलाईन मुख्य समजली जाते. या जलवाहिन्यांतून शहरातील विविध भागांना दररोज सुमारे हजारो दशलक्ष लिटर पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. मात्र, बहुतेक शहरातून ग्रामीण भागाकडे टाकण्यात आलेल्या पाईपलाईन ला भोगम पार्क येथे मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले आहे. गंगाई लॉन, जय भवानी कॉलनी, राजेसंभाजी नगर या ठिकाणी मोठी गळती आहे. एखाद्यावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे जलवाहिनीला गळती लागू शकते. मात्र, सातत्याने या जलवाहिन्यांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पालिकेतर्फे उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु असे होत नसल्याने या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होऊ लागल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना अशा प्रकारे पाणीगळतीवर जर पालिकेने नियंत्रण मिळविले नाही तर पाण्याची समस्या अधिक जटिल होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ज्या ठिकाणी पाणीगळती होत आहे, त्याठिकाणची जलवाहिनी का फुटत आहे याची योग्य ती पाहणी करून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.