कोल्हापूर- गल्लोगल्ली फिरून शहर स्वच्छ करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेचे कार्यालय घाणीचे साम्राज्य बनले आहे. मावा, गुटखा खाऊन भिंती रंगवल्या असून त्याची दुर्गंधी सुटली आहे. ही परिस्थिती आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण आणि पाणीपट्टी विभाग कार्यालयाची. त्यामुळे अंगण स्वच्छ आहे पण घरात उकिरडा आहे, अशी परिस्थिती महापालिकेची बनली आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर नागरिक व कर्मचाऱ्यांकडूनच 'भिंती रंगवण्या'चे काम सुरू आहे.
आयुक्तांनी कारवाई करावी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉ. कादंबरी बलकवडे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. शहर स्वच्छ करण्याचा ध्यास यांनी देखील घेतला आहे. मात्र, शहर स्वच्छ करत असताना महापालिकेची कार्यालये अस्वच्छ आहेत. तसेच कर्मचारी, येणारे नागरिक गुटखा, मावा खाऊन कोपऱ्यात पिचकाऱ्या मारतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कर्मचारी, नागरिकांना महापालिका कार्यालय क्षेत्रात गुटखा, मावा खाण्यास बंदी करावी, तसेच आढळून आल्यास कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे.
पाणी पट्टी विभाग, प्राथमिक शिक्षण कार्यालयाच्या कोपऱ्यात 'पिचकाऱ्या'
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी मार्केटमधील एक बाजूला पाणीपट्टी विभाग, प्राथमिक शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. रोज या विभागात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्यामुळे या कार्यालयात घाणीचे साम्राज्य आहे.
कोरोना काळ...मग गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्या कोणी?
कोरोना काळात राज्यासह कोल्हापूर शहरातील देखील शासकीय कार्यालये बंद होती. त्यावेळी नागरिकांची वर्दळ फारशी नव्हती. केवळ शासकीय कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थिती लावण्यासाठी परवानगी होती. अशा काळात कर्मचाऱ्यांनी गुटखा, तंबाखू आणि मावा खाऊन कार्यालयाच्या भिंती रंगवल्या का? असा प्रश्न देखील उपस्थित होतो.
कायदा कागदावरच
शासकीय कार्यालयाच्या भिंती आणि कोपरे पान आणि गुटख्याने पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसतात. येथे थुंकू नये, असे फलक असलेल्या ठिकाणीच थुंकणारे महाभागही कमी नाहीत. शासकीय कार्यालयांची ही अवस्था तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच आता प्रत्येक शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई आणि गुन्हा नोंदविण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, तो केवळ कागदावरच राहिला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यालय प्रमुखावर कारवाईचा बडगा?
कोल्हापूर महापालिकेचे जवळपास चार विभागीय कार्यालय आहेत. तसेच अन्य ठिकाणी देखील कार्यालय आहेत. असे प्रकार आढळून आल्यास अशा कार्यालय प्रमुखांवर आयुक्तांनी कारवाई करावी. अशी मागणीदेखील थुंकीमुक्त चळवळीच्या दीपा शिपूरकर यांनी केली. ज्या कार्यालयात किंवा परिसरात थुंकणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. अशा कार्यालय प्रमुखांवर देखील नजर ठेवावी अशी देखील मागणी करण्यात आली.
शासकीय कार्यालय, न्यायालयात तर थुंकीखाना
महापालिकेसह शहरातील शासकीय कार्यालय, न्यायालय व विभागीय आरोग्य कार्यालय तर थुंकी खाना बनला आहे. कसबा बावडामधील न्यायालयीन इमारतीतील पानपोई मध्ये पान, गुटखा व मावा खाऊन पिचकारी मारल्या आहेत.