कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेचा २०२१-२०२२ चा सुधारित तसेच २०२२-२०२३ चे नवीन अंदाज अर्थसंकल्प आज (सोमवार) ( Kolhapur Municipal Corporation Budget 2022 ) सादर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. थेट पाईप लाईन योजना , पर्यटनस्थळे, महिला स्वच्छतागृह, आयटी पार्क, आरोग्य सुविधा, पर्यावरण संवर्धन, पाणी पुरवठा वितरण योजना यासह अन्य विकास कामांसाठी 988.31 कोटीचा अंदाजीय अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त बलकवडे यांनी सांगितले. हा सर्व अर्थ संकल्प हा एक रुपयाचा सुद्धा कर वाढ न करता जाहीर करण्यात आला आहे.
एकूण ९८८.३१ कोटीचा अर्थसंकल्प -
कोल्हापूर महानगरपालिकेत आज २०२२-२३ चे अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आले. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राजवट सुरु असून सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेचे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक उपसमितीसमोर सादर केले. यंदाचा अर्थसंकल्प कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. कोणतीही कर वाढ न करता अर्थसंकलप सादर करण्यात आला आहे. तसेच काही नावीन्य पूर्ण योजनाचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2022-23 चे अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये 673.70 कोटी असून खर्च रुपये 672.71 कोटी अपेक्षित आहे. तसेच विशेष प्रकल्पा अंतर्गत सुरु असले कामांचे जमा खर्चाचे स्वतंत्र अंदाज सोबत सादर केले असून त्यामध्ये जमा रुपये 245.49 कोटी अपेक्षित असून खर्च रुपये 241.30 कोटी अपेक्षित आहे. महिला व बालकल्याण निधी व केंद्रीय वित्त आयोगाचे एकत्रित स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा रु. 69.12 कोटी अपेक्षित असून खर्च रु. 68.92 कोटी अपेक्षित आहे.एकूण महसुली, भांडवली व वित्त आयोग मिळून एकूण ९८८ कोटी ३१ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
सर्वांगीण विकासासाठी योजना -
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या या अर्थसंकलपात सुरळीत पाणी पुरवठा, पर्यावरण पूरक प्रकल्प विकसित करणे, इलेक्ट्रिक वाहनाना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच चार्जिंग स्टेशन सुरू करणाऱ्याला मालमत्ता करात सूट देणे, आरोग्य व स्वच्छता अनुषंगिक प्रकल्प, फिरते दवाखाने सुविधा देणे, महिलांसाठी खास फिरते शौचालय, हेरीटेज वास्तू संवर्धन यासह अनेक बाबींवर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहराचे सर्वांगिण विकास व रोजगार निर्मितीसाठी आय.टी.पार्क असणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या टेंबालाईवाडी येथील आरक्षीत जागेवर पीपीपी माध्यमातून आयटी पार्क विकसित करणेबाबत प्रस्तावीत आहे. यासाठी आवश्यक फिजीबीलीटी रिपोर्ट व अनुषंगिक काम पूर्ण करणेत आले आहे. याकामी निविदा प्रक्रीया राबवून आयटी पार्क विकसीत करणेबाबत प्रस्तावीत आहे. याकामी अनुषंगिक कामासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे.