कोल्हापूर - कोल्हापूरात ( Kolhapur Rain ) गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy rain ) सुरू आहे. परिणामी पुन्हा एकदा जिल्ह्यात महापुराची ( Flood ) पुनरावृत्ती होते, की काय अशी भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच काल दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याचा वेग मंदावला आहे. गेल्या 15 ते 16 तासांपासून पंचगंगा नदीच्या ( Panchganga river ) पाणीपातळीत केवळ 6 इंचांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पंचगंगा 32.6 फुटांवरून वाहत आहे. इशारा पातळी गाठण्यासाठी अद्याप 6 ते 7 फुटांची गरज आहे. त्यामुळे असाच पाऊस राहिल्यास कदाचित धोका पातळीपर्यंत सुद्धा पाणीपातळी पोहोचणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, हवामान खात्याने पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा ( Heavy rain ) इशारा दिला आहे. त्यामुळे त्यावरच पुढची परिस्थिती अवलंबून असणार आहे.
9 जुलैपर्यंत जोरदार पाऊस -भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात याच पध्दतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य: स्थितीत इशारा पातळीपर्यंत उद्या 8 जुलै पहाटेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आज आणि उद्या होणाऱ्या पावसावरच कोल्हापूरात महापुराची परिस्थिती निर्माण होईल, की नाही किंवा पंचगंगा धोका पातळीपर्यंत पोहोचेल का हे समजू शकणार आहे.