कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 2019 पेक्षाही भयानक परिस्थिती होईल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली असून एनडीआरएफ पथकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. आणखी काही जवानांच्या टीम सुद्धा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
2019 पेक्षाही धोकादायक परिस्थिती; फक्त शासकीय वाहनांना इंधन मिळणार - सतेज पाटील पंचगंगेची पाणी पातळी 52 फुटांवर
पावसाचा वाढता जोर पाहता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गतवर्षी जवळपास 56 फुटांपर्यंत पाणी पातळी पोचली होती. सध्या हीच पाणीपातळी आता 52 फुटांहून अधिक झाली आहे. शिवाय पावसाचा जोर काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे अजूनही भयानक परिस्थिती होण्याची शक्यता आहे असेही पालकमंत्री पाटील यांनी म्हटले. कोल्हापुरातील महापुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्वतः पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील येथील शिवाजी पूल येथे आले होते. यावेळी ते 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
महामार्ग बंद होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक वस्तूंचा साठा
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे काही वेळातच पुणे-बेंगलोर महामार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. 2019 च्या महापुराचा अनुभव पाहता, तेव्हा शहरामध्ये येणारे सर्व मार्ग बंद झाल्याने अत्यावश्यक सेवांसह इंधनाचा साठा पूर्णपणे संपला होता. त्यामुळे तीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आतापासूनच अत्यावश्यक सेवा आणि इंधनाचा साठा करून ठेवण्याबाबत चे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय पेट्रोल-डिझेल केवळ शासकीय यंत्रणेच्या व्यक्तींनाच देण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
हेही वाचा -Kolhapur Floods : आंबेवाडी, चिखलीतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर