कोल्हापूर -कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. त्यावर आज कॅबिनेट बैठकीत राज्यातील पूरग्रस्त भागांसाठी 11 हजार 500 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. या निर्णयाचे कोल्हापुरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, गेल्या वर्षी अनेक नागरिकांना या मदतीसाठी हेलपाटे मारावे लागले. हे यंदाच्या महापुराच्याबाबतीत घडू नये. मदत सर्वांपर्यंत पोहोचवावी, अशी भावना कोल्हापुरातील पूरग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया देताना पूरग्रस्त हेही वाचा -महाविकास आघाडी २५ वर्ष टिकेल; त्या पत्रातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न - मुश्रीफ
राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने 11 हजार 500 कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली आहे. यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यकरण यावर खर्च केला जाईल. आपत्तीग्रस्त नागरिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत देण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या निधीपैकी मदतीसाठी 1 हजार 500 कोटी, पुनर्बांधणीसाठी 3 हजार कोटी व बाधित क्षेत्रात उपाययोजनांसाठी 7 हजार कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजचे कोल्हापूरवासीयांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा निर्णय घेतला, मात्र त्यांनी भरघोस मदत जाहीर केली आहे. मात्र, शेवटपर्यंत पूरग्रस्तांना मदत झाली पाहिजे. यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी यावेळी पूरग्रस्तांनी केली.
हेही वाचा -कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधितांच्या पुनर्वसनाची सुरुवात भेंडवडे गावापासून करुया - पालकमंत्री