कोल्हापूर - मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधात आज कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली. पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत नाहीत. या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला आहे. याबाबतची भूमिका महापौर निलोफर आजरेकर यांनी मांडली.
मराठा आरक्षण : संभाजीराजेंना भेटीसाठी पंतप्रधान वेळ देत नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेची महासभा तहकूब - maratha reservation news
मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधात आज कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली.
तामिळनाडू सरकारने दिलेले आरक्षण व मोदी सरकारने सवर्णासाठी दिलेले आरक्षण ही दोन्ही प्रकरणे असताना मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला स्थगितीचा निर्णय धक्कादायक आहे. सर्वसामान्य मराठा समाजासाठी आरक्षणाचा निर्णय मार्गी लागणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास महापौर निलोफर आजरेकर यांनी व्यक्त केला.
मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी कोल्हापूर महापालिकेतील सर्व नगरसेवकांचा पाठिंबा आहे. म्हणून आज होणारी महासभा तहकूब करण्यात येत असल्याची माहिती महापौर आजरेकर यांनी दिली. सभा सुरू झाल्यानंतर एकही नगरसेवक सभागृहात दाखल झाला नाही.