कोल्हापूर - कोरोनाच्या नव्या ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा पूर्वीप्रमाणेच कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रवेश हवा असल्यास आता कोरोना चाचणी अहवाल ( आरटीपीसीआर ) निगेटिव्ह लागणार आहे किंव्हा ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, त्यांनाच प्रवेश मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल नवे आदेश जारी केलेत. शिवाय नियमावलीचे पालन करणे बंधनकारक केले.
हेही वाचा -RTPCR Test : कर्नाटकात आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धसका जगभरातील सर्वच देशांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सुद्धा याचा चांगलाच धसका घेतला असून त्यानुसार आत्तापासूनच नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये मास्क कोणत्या पद्धतीचा वापरावा याबाबत सुद्धा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, जुन्या कोरोना व्हेरिएंटपेक्षा नवीन व्हेरिएंट अधिक वेगाने प्रसार करतो आहे. त्यामुळे, याची सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एन - 95, सर्जिकल, किंव्हा तीन थरांचे मास्क वापरावे. जर कापडाच्या एकाच थराचे मास्क किंव्हा रुमाल बांधला असेल तर, आपण मास्क घातलाच नाही, असे गृहीत धरून आपल्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे, आता मास्कसुद्धा चांगल्या दर्जाचे वापरण्याचे आदेश त्यांनी दिलेत.