कोल्हापूर-महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मात्र, या प्रारूप यादयांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहेत. हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागांच्या प्रारुप यादीत आली आहेत. हा याद्यातील घोळ मिटेपर्यत महापालिका निवडणूक घेण्यात येऊ नयेत, अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिला आहे.
तोपर्यंत कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूका घेऊ नका ! भाजपने केला विरोध - कोल्हापूर महापालिका निवडणूकी बद्दल बातमी
प्रारूप यादयांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहेत. हा याद्यातील घोळ मिटेपर्यत महापालिका निवडणूक घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी भाजप जिल्हाअध्यक्षानी केली आहे.
![तोपर्यंत कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूका घेऊ नका ! भाजपने केला विरोध Kolhapur BJP has alleged a lot of confusion in the draft lists.](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10764579-551-10764579-1614184683832.jpg)
याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे ईमेल द्वारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, १८ आणि २३ फेब्रवारीरोजी रोजी भाजपच्या शिष्टमंडळाने उपायुक्त यांना प्रत्यक्ष भेटून मतदार याद्यांतील सुरु असलेल्या गंभीर त्रुटीबाबत सविस्तर निवेदन दिले होते. यात अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. प्रभाग क्रमांक ३२ मध्ये २१६३, प्रभाग क्रमांक ३३ मध्ये सुमारे २१०० तर प्रभाग क्रमांक ४८ मध्ये सुमारे १८०० नावांवर हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत. सध्याच्या प्रारूप याद्या रद्द करून नवीन प्रारूप याद्या कराव्यात, अशी मागणी केली आहे.
१६ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या रद्द कराव्यात व पुन्हा नव्या प्रारूप याद्या तयार कराव्यात. हरकती दाखल करण्याची मुदत नवीन याद्या जाहीर झाल्यानंतर किमान १० दिवस ठेवावी. प्रारूप याद्यांचे प्रत्येक वॉर्ड स्तरावर जाहीर वाचन करावे. प्रारूप याद्या करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी भाजपने केली आहे.
आज संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, गायत्री राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
भाजपने केलेल्या मागण्या-
1) दिनांक १६/०२/२०२१ रोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या रद्द कराव्यात व पुन्हा नव्या प्रारूप याद्या तयार कराव्यात.
2) प्रारूप याद्यांवर हरकत दाखल करण्याची मुदत नवीन याद्या जाहीर झाल्याच्या दिवसापासून पुढे सुट्टीचे दिवस सोडून किमान दहा (१०) दिवस ठेवावी.
3) प्रारूप याद्यांचे प्रत्येक वॉर्ड स्तरावर जाहीर वाचन करावे व नागरिकांपर्यंत त्याचा कार्यकम पोहचवावा.
4) प्रारूप याद्या करण्यात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करावी.