महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये अडीच हजार उद्योग बंद, रोजगार निर्माण करण्यात सरकार अपयशी'

विधानसभा निवडणुकांसाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ ज्योतिरादित्य सिंधिया आज कोल्हापूरमध्ये होते. यावेळी 'युथ कनेक्ट' कार्यक्रमात बोलताना त्यांनी तरुणांना शिक्षणासोबतच अनुभवही महत्त्वाचा असल्याचे सांगत, रोजगार निर्माण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका केली.

By

Published : Oct 18, 2019, 1:31 PM IST

Updated : Oct 18, 2019, 1:55 PM IST

Jyotiraditya scindia in Kolhapur

कोल्हापूर- कोल्हापूरमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, रोजगार निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये २,५०० उद्योग सरकारने बंद केले आहेत. अशी टीका काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. कोल्हापूरमध्ये 'यूथ कनेक्ट' या कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकांसाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला कोल्हापूर नगरीत येण्यास मिळाले हे माझे सौभाग्य आहे, असे म्हणत ज्योतिरादित्य यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तसेच, मी 'तुमच्या' कोल्हापूरमध्ये नाही, तर 'माझ्या' कोल्हापूरमध्ये आलो आहे, असेही ते म्हणाले. आपल्याला भविष्य घडवायचे असेल, तर इतिहास विसरून चालणार नाही. साताऱ्याजवळ असलेल्या कण्हेरखेड गावचे आम्ही पाटील आहोत, तिथूनच आमची सुरुवात झाली, इथल्या मातीशी मी जोडलेलो आहे; असे म्हणत त्यांनी श्रोत्यांना भावनिक साद दिली.

हेही वाचा : दक्षिणचा एकच आवाज 'ऋतुराज'; पुतण्यासाठी सतेज पाटील झाले गायक

महाराष्ट्र सरकारने, चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकला हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराज हे देशातील सर्वश्रेष्ठ योद्धा होते, असेही सिंधिया म्हणाले.

कोल्हापूरमध्ये रोजगाराच्या अनेक संधी...
कोल्हापूरमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. कृषी, फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी कोल्हापूरमध्ये अनेक संधी आहेत. दूध उत्पादनात भारत पहिल्या नंबरला आहे, तर भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या नंबरला आहे. आपल्याकडे कच्चा माल भरपूर प्रमाणात तयार होतो, मात्र त्यातील केवळ दहा टक्के अन्नावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे, या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, मात्र यामध्ये महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. उलट, गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने २,५०० उद्योग बंद केले आहेत, अशी टीका सिंधिया यांनी केली.

ऋतुराजला संधी दिल्यास कार्यक्षमता दाखवेल...
ऋतुराजला तुम्ही संधी द्याल, तर तो त्याची कार्यक्षमता नक्कीच तुम्हाला दाखवेल. आपल्या आशिर्वादाने ऋतुराज नक्कीच आमदार बनेल, आणि त्यानंतर दर सहा महिन्यांनी ऋतुराज हे सिद्ध करेल, की जे त्याने सांगितले होते, ते त्याने करून दाखवले. रोजगारासाठी, उद्योगनिर्मितीसाठी तसेच फ्रीलान्सिंगसाठी आपण वेबसाईट सुरु करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षणासोबतच अनुभवही महत्त्वाचा...
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी शिक्षणासोबत अनुभवही महत्त्वाचा असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना त्यांनी स्वतःची एक आठवणदेखील सांगितली. मी अमेरिकेत शिकत असताना, पहिल्या वर्षानंतर अडीच महिन्यांच्या सुट्टीसाठी भारतात आलो होतो. परत गेल्यावर सोबतच्या सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्याचे सांगितले. मात्र, मी सुटीमध्ये काहीच काम नव्हते केले. तेव्हा अडीच महिने वाया घालवल्याचे लक्षात येताच, मी स्वतःच्याच नजरेत खाली गेलो. त्यानंतर मात्र, मी एक वर्ष संयुक्त राष्ट्रांमध्ये काम केले, नंतर न्यूयॉर्क, हाँगकाँगध्ये मी नोकरी केली. असे सांगत, आत्ता तुम्ही जो अनुभव कमवाल, तो तुम्हाला नक्कीच भविष्यात कामी येईल असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

हेही वाचा : शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करा - ज्योतिरादित्य सिंधिया

Last Updated : Oct 18, 2019, 1:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details