कोल्हापूर- 'हारा नही हू मै बस खेल समज रहा था! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा होगा!' असे ट्विट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. खरे तर या ट्विट मागे काय दडले आहे? तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षात बद्दल असणारी खदखद या ट्विटमधून व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वेगळी वाटचाल असणार काय? या ट्विटरचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याबद्दल ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी राजू शेट्टी यांची बातचीत केली आहे.
एक्सक्लूसिव्ह : स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी वाट धरणार? हारा नही हू मै बस खेल समज रहा था! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा होगा!' असे ट्विट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून या ट्विटची राज्यभरात चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपशी मैत्री केली. मात्र, त्यावर नाराज होऊन शेट्टी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा महा विकास आघाडी ला जवळ केले. या ना त्या कारणाने महाविकास आघाडीने मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानीचा स्वाभिमान दुखवत असल्याची भावना शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी हे ट्विट केले आहे.
राजू शेट्टी म्हणाले, लोकसभेमध्ये झालेला पराभव माझ्यासह सर्वांनाच धक्कादायक होता. पराभवानंतर मी राज्यभर फिरलो. लोकांच्या भावना समजून घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. राजकारणात उलथापालथ झाली. त्यामुळे राज्यकर्त्यांची भावना समजून आली. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना सामान्यांचे प्रश्न घेऊन लढणारी संघटना आहे. सामान्यांच्या प्रश्नांचे भांडवल करण्यात विरोधी पक्षाला रस आहे. मात्र मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कोणाला रस नाही. अशी भावना लोकांची झाली आहे. असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. जनतेसोबत विरोधी पक्ष असतो पण विरोधी पक्ष सत्तेत गेला की सोयीस्कररीत्या प्रश्न बाजूला पडतात. त्यामुळे सातबारा कोरा केल्याशिवाय आमक्या तमक्क्याची अवलाद नाही. अशा गप्पा ठोकल्या जातात. अशी वक्तव्य करण्यास काँग्रेस भाजप राष्ट्रवादी व शिवसेना ही मागे नाही. सत्ता मिळाली की सर्व प्रश्न सोयीस्कर विसरले जातात. असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
पेट्रोल, डिझेल, गॅसची प्रचंड महागाई वाढली आहे. याबद्दल महाविकासआघाडी तून आवाज उठवला पाहिजे होता. मात्र, त्यावर आवाज उठवायला कोणीही तयार नाही. दिल्लीमध्ये शेतकरी कायद्याविरोधात गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात साडेतीनशे शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यावर महा विकास आघाडीतील घटक पक्षाने देखील व्यक्त व्हायला हवे होते. मात्र, त्या पद्धतीने व्यक्त होताना दिसत नाही. असे शेट्टी म्हणाले. केवळ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे म्हणजेच सर्व काही नाही, या उलट महा विकास आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, सध्या वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले. त्याचा फटका दहावी आणि बारावीतील असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. याचे काहीच गांभीर्य महाविकास आघाडी सरकारला नाही. एका बाजूला शिक्षण सम्राटांनी भरमसाठ फी पालकाकडून घेतली. शिवाय संस्थेत काम करणाऱ्या शिक्षक आणि प्राध्यापकांना वेतन दिले नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ फी आकारली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले. या मूलभूत प्रश्नाकडे कोणाचे लक्ष आहे का? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे. सामान्यांचे प्रश्न सभागृहात उपस्थित करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. मात्र, या विरोधी पक्षाने सामान्यांचे मूलभूत प्रश्न सभागृहात विचारले का? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केला. आणि हीच खदखद राजू शेट्टी यांनी ट्विट मधून व्यक्त केले असल्याचे सांगितले.
सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणावी तशी ताकद लागते. मात्र, ती ताकद स्वाभिमानी पक्षाची कमी पडते. त्या वेळी एखाद्या मजबूत पक्षाला सोबत घ्यावे लागते, पण दुर्दैवाने या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे पुढे पक्षाची भूमिका काय असेल? याचा विचार नक्की केला जाईल असे शेट्टी म्हणाले.
राज्याच्या राजकारणात सध्या आरोप आणि प्रत्यारोप सुरू असून राजकीय धुळवड सुरू झाली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात शेतकऱ्यांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठे दिसत नाहीत. वीज खंडित झाली त्याबद्दल चर्चा केली का? तर त्याबद्दल चर्चा झाली नाही. उलट कोरोणाच्या नावाखाली भ्रष्टाचार झाले. विरोधी पक्षाच्या कंगना राणावत, सुशांत राजपूत, अर्नब गोस्वामी या विषयात रस आहे. अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन कांड्या ठेवल्या त्याचा स्फोट होणार नाही. हे माहिती असताना याची चर्चा सुरू आहे. मात्र, नक्षलवाद्यांनी आपले २२ जवान मारले त्या बद्दल बोलायला कोणीही तयार नाही असे शेट्टी म्हणाले. सध्या पंढरपूरची पोटनिवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत जनतेचा निर्णय पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटना योग्य निर्णय घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.