कोल्हापूर -गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दिलेले आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर्ण केले आहे. गोकुळच्या दूध उत्पादकांना दिलासा देत म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयाचे तर गाईच्या दुधात एक रुपयाची वाढ केली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरात दोन रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना आता दोन रुपये जादा देऊन गोकुळ दूध खरेदी करता येणार आहे. त्याबाबतची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली.
11 जुलैपासून लागू होणार नवे दर
कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक केंद्र समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची आज पत्रकार परिषद पार पडली. यात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील आणि संचालक उपस्थित होते. गोकुळच्या दूध उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा आज करण्यात आली. गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हशीच्या दूध खरेदी दराला प्रतिलीटर दोन रुपयाची वाढ देण्यात आली. हे नवीन दर 11 जुलैपासून लागू होणार आहेत. याबाबतची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. ते पुढे म्हणाले, की दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन काही दिवसातच आम्ही पूर्ण केले आहे. गोकुळ दूध संघात सत्ता आल्यानंतर प्रत्येक पातळीवर आम्ही बचत करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत गोकुळची व्याप्ती वाढली पाहिजे, यासाठी राज्य सरकारच्या मदतीने जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दोन रुपयांची वाढ