कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील विजयाताई पाटील या बहिणीच्या ऑफिस व घरी दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने छापा टाकला आहे. सकाळी 11 वाजता आयकर विभागाचे अधिकारी पुन्हा ऑफिसमध्ये दाखल होऊन झाडाझडती करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या ठिकाणी प्रवेश बंदी असून, सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा - गुरुवारीही टाकले होते छापे -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील बहीण विजयाताई मोहन पाटील यांच्या घरावर आणि ऑफिसवर गुरुवारी आयकर विभागाने गुरुवारी छापा टाकला होता. गुरुवारी दिवसभर कागदपत्र आणि माहिती घेण्याचे काम जवळपास दहा अधिकाऱ्यांच्या पथकाकडून सुरू होते. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
आज सकाळी अकरा वाजता पुन्हा आयकर विभागाचे अधिकारी राजारामपुरीतील मुक्ता पब्लिशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिसमध्ये दाखल झाले. तर करवीर तालुक्यातील वाशी येथे असणाऱ्या राहत्या घरी देखील आयकर विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा छापा टाकला आहे.
- सुरक्षेसाठी सीआरपीएफ तैनात -
याठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने याठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. तर याठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. राजारामपुरीतील ऑफिसमध्ये चार अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्र आणि माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचे छापे पडल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -नियमाने जे काही असेल ते जनतेसमोर येईल... घाबरायचे काहीही कारण नाही - अजित पवार