कोल्हापूर- कोल्हापुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील 64 गावांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील एकाही कोरोना बाधिताची नोंद या गावात झालेली नाही. नियमांचे काटेकोरपणे पालन करत कोरोना विरुद्धच्या लढाईत ही गावे अविरतपणे लढत आहे. त्यावर ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांचा स्पेशल रिपोर्ट.
64 गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही
कोल्हापुरात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील आकडा 1 लाख 25 हजारांच्या आसपास आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. मात्र काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या जवळपास पन्नास हजारपर्यंत पोहोचली होती. तर आता यात वाढ होऊन आतापर्यंत 1 लाख 25 हजारापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात १२२५ गावांपैकी 64 गावे आहेत जिथे आजपर्यंत कोरोनाने शिरकाव केला नाही. हे सर्व शक्य झाले ते सामूहिक संघटन, कडक नियमांची अंमलबजावणी आणि वारंवार समुपदेशन. कोल्हापूर जिल्ह्यातील 64 गावे अशी आहेत जिथे आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
ईटीव्ही भारतकडून बोलोली ग्रामपंचायतीचा ग्राऊंड रिपोर्ट
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करवीर तालुक्यातील बोलोली ग्रामपंचायत आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात वाड्यांमध्ये आजपर्यंत एकही कोरोना बाधिताची नोंद झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने या ग्रामपंचायतीचा ग्राउंड रिपोर्ट चेक केला. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुर्गुळेवाडी, स्वयंभूवाडी, विठ्ठलाईवाडी, शिप्पेकरवाडी, सडोलीकरवाडी मारुतीचा धनगर वाडा, माथ्याचा धनगर वाडा अशा ठिकाणी जवळपास सात हजार पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मात्र या वाढीमध्ये दोन्ही लाटेत एकही रुग्ण सापडलेला नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कडक नियमांची अंमलबजावणी, सामाजिक आंतर, मास्क बंधनकारक, गावाच्या वेशीवरच समुपदेशनाचे धडे तसेच शहरात कामाला येणाऱ्या नागरिकांचे समुपदेशन केल्यानेच आजपर्यंत या गावात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नसल्याचे सरपंच आणि आरोग्यसेवक सांगतात. सॅनेटायझरची उपलब्धता नसल्याने दर दोन तासाने आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत, सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच आहार याचे मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या वाड्यावर जाऊन मार्गदर्शन करत असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.