कोल्हापूर - जिल्ह्याचा थोरला दवाखाना म्हणून येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची म्हणजेच सीपीआर ची ओळख आहे. नेहमीच या रुग्णालयात अनेक उणिवा आणि गैरसोयींबाबत अनेक बातम्या ऐकल्या आणि वाचल्या जातात. मात्र, कोरोना काळात गेल्या 7 महिन्यांत सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सुविधांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. कशा पद्धतीने सीपीआरचे रुपडं पालटलं आहे, यावरचा 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट...
कोविड काळात सीपीआर रुग्णालयातील सुविधांमध्ये अनेक सुधारणा पहिलं कोविड रुग्णालय - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला सर्वात प्रथम पूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. तब्बल 7 महिने या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. जवळपास 350 रुग्णांवर एकाच वेळी या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र याच दरम्यान रुग्णालयात उपलब्ध यंत्रसामग्रीच्या जोरावर अनेक रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश आले तर, काहींचा उपचारादरम्यान मृत्यू सुद्धा झाला. मात्र, कोरोनाच्याच काळात याच रुग्णालयात अनेक सुधारणा झाल्या. त्याचा आता भविष्यात अनेक रुग्णांना फायदा होणार आहे.
हेही वाचा -राज्यात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ३० मृत्यू
कोणकोणत्या महत्त्वाच्या सुधारणा झाल्या यावर एक नजर -
1) 20 हजार लिटरची ऑक्सिजन टाकी -
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी सीपीआरमध्ये तब्बल 20 हजार लिटरची ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवसाला जवळपास 450 रुग्णांची एकाच वेळी ऑक्सिजनची सोय होणार असून भविष्यात सुद्धा अनेक रुग्णांना याचा लाभ होणार आहे. कोरोनाकाळात सीपीआर रुग्णालयात झालेल्या महत्त्वाच्या सुविधांपैकी हा एक मोठा बदल म्हणावा लागेल.
2) 20 आयसीयू बेड वरून झाले 92 आयसीयू बेड -
अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी केवळ 20 बेड सीपीआर रुग्णालयात उपलब्ध होते. मात्र तीच संख्या आता जवळपास 92 वर जाऊन पोहोचली असल्याची माहिती सीपीआरमधील वैद्यकीय अधीक्षक राहुल बडे यांनी दिली. शिवाय अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा पुढे येऊन मोठ्या प्रमाणात मदत केली असल्याचीही माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
3) कोरोना चाचणीसाठी 2 मशीन -
सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या चाचण्या पुण्यामध्ये होत होत्या. कोल्हापूरातील सर्व सॅम्पल पुण्याला पाठवावे लागत होते. मात्र आता मायक्रो बायोलॉजी विभागात दोन सुसज्य मशीन्स आणण्यात आली आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांच्या चाचण्या व्हायला मदत झाली आहे.
दानशूर संस्थांकडून मदत -
कोरोनाकाळात अनेक दानशूर संस्थांनी पुढे येऊन जिल्ह्यातल्या काही रुग्णालयांना मदत केली आहे. यामध्ये सीपीआर रुग्णालयात सुद्धा मोठी मदत मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बैतुलमाल कमिटी, क्रोमा रिसर्च संस्था यांनी प्रत्येक 10 बेडचे आयसीयू विभाग बनवून दिले. त्याचबरोबर शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनकडूनसुद्धा तब्बल 8 व्हेंटिलेटर सीपीआरला प्राप्त झाले. अनेकांनी वॉर्डसाठी बेड, तर काहींनी इंटेरिअरसाठी सुद्धा मदत केली आहे. अशा अनेक संस्था, आणि दानशूर व्यक्ती आहेत, ज्यांनी सीपीआरला मोठ्या प्रमाणात मदत केली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक राहुल बडे यांनी म्हंटले आहे.
कोरोनाकाळात जवळपास 4 कोटींच्या सुधारणा -
कोरोनाकाळात सीपीआर रुग्णालय अनेकांसाठी मोठा आधार ठरला. याच सीपीआर रुग्णालयाबद्दल नेहमीच अनेकजण उणिवा आणि इथल्या गैरसोयीबाबत बोलत असतात. मात्र, कोरोनाकाळात तब्बल 4 कोटींपर्यंतच्या सुविधा सीपीआर रुग्णालयात झाल्या असून याचा भविष्यात अनेक रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
आयजीएम रुग्णालयात सुद्धा 6 हजार लिटरची ऑक्सिजनची टाकी -
ज्या पद्धतीने कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात 20 हजार लिटर लिक्विड ऑक्सिजनची टाकी बसवण्यात आली, त्यानंतर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुद्धा 6 हजार लिटरची लिक्विड ऑक्सिजनची टाकी बसवण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला 200 हून अधिक रुग्णांच्या ऑक्सिजनची एकाच वेळी होय होऊ लागली आहे.
कोल्हापूरातील कोरोनाची सद्यस्थितीत आकडेवारी -
कोरोनाने देशासह संपूर्ण जगामध्ये कहर केला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, अनेक जण अजून रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कोल्हापुरातही एकूण कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 49 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 46 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 1 हजार 671 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 525 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हेही वाचा -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बीएमसी सज्ज