कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेत झालेल्या घरफाळा घोटाळ्यात मुख्य संशयित आरोपीने 1 कोटी 55 लाख 44 हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे अंतिम अहवालात निदर्शनास आलं आहे. या घोटाळ्याचा प्रमुख असणारा मनपा अधिकारी संजय भोसले यांना महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याचे सांगत मनपा अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह 7 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आत्मदहन करण्याचा इशाराही भूपाल शेटे यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
भूपाल शेटे - माजी उपमहापौर दरम्यान, महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, करनिर्धारक व संग्राहक वर्षा परीट, रवका अधिकारी अशोक यादव, कामगार अधिकारी सुधाकर चन्नावार या सात जणांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे. तसेच आठ दिवसात विविध मार्गाने आंदोलन करूनही मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांकडून फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ : संजय भोसले हा प्रभारी करनिर्धारक व संग्राहक असताना त्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या संगणकामध्ये एडिट व डिलीट प्रणालीचा वापर करून बोगस व बनावट घरफाळा घोटाळा केला असल्याचे समोर आले आहे. तब्बल 1 कोटी 55 लाख 44 हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे अंतिम अहवालात निदर्शनास आलं असून याबाबत अहवाल महापालिका प्रशासन कादंबरी बरकडे यांच्या मंजुरीने लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे आठ सप्टेंबर 2021 रोजी पाठवण्यात आलेला आहे. मात्र, संशयित आरोपी संजय भोसले हा एका युनियनचा अध्यक्ष असल्याने त्याच्या दबावामुळे महापालिकेतील एकूण 7 अधिकारी ज्यामध्ये अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, घरफाळा विभाग उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर ,प्रभारी करनिर्धारक व संग्राहक वर्षा परिठ, रवका अधिकारी अशोक यादव, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावर हे संशयित आरोपी संजय भोसले यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यास व गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप माजी महापौर भूपाल शेटे यांनी केला आहे.
माजी उपमहापौरांनी दिला आत्मदहनाचा इशारा: अधिकाऱ्यांची फिर्याद देण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आपल्या कर्तव्यात प्रामाणिकपणे पार न पाडणे असून या सर्व अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केली आहे अन्यथा महापालिकेच्या दारात सुभाष नगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते व नियमित घरफळा भरणारे कुष्ठरोगी बांधव व त्यांच्या चार मतदारसंघातील नागरिक यांच्यासह महापालिकेच्या दारात धरणे आंदोलन तसेच आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच स्वत आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.