कोल्हापूर - विविध मागण्यांसाठी हॉटेल कामगार आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरत 'थाळीनाद' आंदोलन केले आहे. मागील 7 महिन्यांपासून हॉटेलसेवा बंद होती. त्या काळात अनेक कामगारांना पगार मिळाला नाही. तसेच अनेक वर्षांपासून कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. याच पार्श्वभूमीवर हॉटेल कामगार संघटनेने कोल्हापुरातील दसरा चौक येथे थाळीनाद आंदोलन केले.
विविध मागण्यांसाठी हॉटेल कामगार संघटनेचे कोल्हापुरात 'थाळीनाद' आंदोलन - कोल्हापूर हॉटेल कामगार संघटना
मागील 7 महिन्यांपासून हॉटेलसेवा बंद होती. त्या काळात अनेक कामगारांना पगार मिळाला नाही. तसेच अनेक वर्षांपासून कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. याच पार्श्वभूमीवर हॉटेल कामगार संघटनेने कोल्हापुरातील दसरा चौक येथे थाळीनाद आंदोलन केले.
अनेक व्यवसायांपैकी महत्त्वाचा व्यवसाय म्हणून हॉटेल क्षेत्राकडे पाहिलं जातं आणि याच हॉटेल व्यवसायामध्ये कोट्यवधी कामगार काम करत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर अनेकांना 7 महिने घरी बसून राहावे लागले. यामुळे पगार नाहीत. अनेकांना अजूनही कामावरती रुजू करून घेतलं नाहीये. सर्वच कामगारांच्या घरामध्ये आता काळी दिवाळी साजरी होत आहे. अनेक वर्षांपासून या कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. शासनाने यासाठी विधानसभा व लोकसभा येथे स्वतंत्र कायदे बनवावेत. शिवाय या कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा येत्या 26 नोव्हेंबर रोजी पुणे - बंगळुरू महामार्ग रोखू, असा इशारा हॉटेल कामगार संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे यांनी दिला आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्यांवर एक नजर :
1) सर्व हॉटेल कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळाला पाहिजे.
2) कोरोना काळात हॉटेल बंद असल्यामुळे अनेकांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे शासनाने त्यांना 30 हजार रुपये मदतनिधी दिला पाहिजे.
3) हॉटेल कामगारांना किमान समान वेतन मिळाले पाहिजे.
4) वेळेवर पगार दिला पाहिजे.
5) संसदेत केंद्र सरकारने संमत केलेले कामगार विरोधी प्रमुख कोड बिल मागे घ्या.
6) महिन्यातून 4 पगारी सुट्ट्या मिळाले पाहिजेत.
7) वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येकाला पेन्शन मिळाली पाहिजे.
8) महाराष्ट्र राज्य हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
9) हॉटेल कामगारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.
10) प्रॉव्हिडंट फंड पगारातून कपात झाला पाहिजे.
11) विमा संरक्षण मिळाले पाहिजे.
12) हॉटेल कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म व त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.
13) हॉटेल कामगारांना आरोग्य सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत.
14) कामगार कायद्यानुसार आठ तासांपेक्षा जास्त काम लावू नये. ज्यादा कामाचा पगार योग्य मिळावा.
15) हॉटेलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या कामगारांची राहण्याची व जेवण व्यवस्था सुस्थितीत करावी.